सोलापुरात महिला डॉक्टरने संपवलं आयुष्य; हाय प्रोफाईल प्रकरणात उद्योजकासह मुलाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 06:28 PM2024-06-12T18:28:56+5:302024-06-12T18:30:53+5:30

सोलापुरात डॉ. ऋचा रुपनर आत्महत्या प्रकरणात त्यांचे पती आणि सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

Solapur Dr Richa Rupner husband and father in law arrested in death case | सोलापुरात महिला डॉक्टरने संपवलं आयुष्य; हाय प्रोफाईल प्रकरणात उद्योजकासह मुलाला अटक

सोलापुरात महिला डॉक्टरने संपवलं आयुष्य; हाय प्रोफाईल प्रकरणात उद्योजकासह मुलाला अटक

Dr Richa Rupner Case :  सोलापूरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन महिला डॉक्टरांनी आत्महत्या केली. याप्रकरणी आता उद्योजक आणि त्यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वी डॉ. ऋचा सूरज रूपनर यांनी पतीच्या त्रासाला कंटाळून स्वतःचं आयुष्य संपवलं होतं. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापलं होतं. आरोपींच्या अटकेसाठी डॉक्टरांच्या संघटनांनी आंदोलन केले होते. त्यानंतर पोलिसांनी डॉक्टर ऋचाचे पती आणि सासऱ्यांना अटक केली आहे.

पंढरपूरच्या सांगोल्यातील ज्येष्ठ उद्योजक भाऊसाहेब रूपनर यांच्या सून असलेल्या डॉ. ऋचा सूरज रूपनर यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.  ऋचा रुपनरने कौटुंबिक छळाला आणि हिंसाचाराला कंटाळून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. डॉक्टर ऋचा या पती डॉ. सूरज रूपनर याच्या सोबत पंढरपुरात फॅबटेक हॉस्पिटल चालवत होत्या. एमआरआय मशीन विकत घेण्यासाठी पती सूरज रूपनरने ऋचा यांना जमिनीवर कर्ज काढ किंवा माहेरच्यांकडून पैसे घेऊन ये, असा तगादा लावला होता. या त्रासाला कंटाळून ऋचा रूपनर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तक्रार दाखल होत नसल्याने सोशल मीडियावर सांगोल्यातील डॉक्टरांनी मोहिम सुरु केली होती. पंढरपुरातील डॉक्टर्सनी एकत्र येत सांगोला पोलीस ठिय्या आंदोलन केले होते.

ऋचा यांचे बंधू ऋषिकेश संजय पाटील यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली होती. डॉ. ऋचा आणि डॉ. सूरज यांचा विवाह आठ वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना एक मुलगा आहे. मात्र डॉ. सूरज हा व्यभिचारी होता. एमआरआय मशिनसाठी त्याने ऋचाच्या मालकीची जमीन गहाण ठेवून कर्ज काढावे किंवा माहेरुन पैसे आणावेत असा तगादा लावला होता. त्यामुळे ऋचाने आत्महत्या केली, अशी माहिती ऋषिकेश पाटील यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. 

६ जून रोजी ऋचाने गळफास घेवून आत्महत्या केली. त्यानंतर तीन दिवसांनी डॉक्टर सुरज रुपनर यांच्या विरोधात सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आधी ऋचाचे सासरे भाऊसाहेब रुपनर यांना अटक केली. त्यानंतर सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीतून पोलिसांनी सूरज रुपनर यांना अटक केली.

महिला आयोगाने घेतली दखल

या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून या प्रकरणात आयोग पाठपुरावा करेल असे अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. "सोलापूरमध्ये पती डॉ.सूरज रुपनर यांच्याकडून होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराला, मानसिक त्रासाला कंटाळून डॉ.ऋचा पाटील यांनी आत्महत्या केल्याची घटना माध्यमातून समोर आल्यानंतर काल मी पोलीस निरीक्षकांशी फोनवर चर्चा केली होती. फरार आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी पोलिसांच्या शोध पथकांची संख्या वाढवण्याच्या सूचना काल केल्या होत्या.त्यानुसार कारवाई होत आज सकाळी आरोपी पती आणि सासरे यांना अटक करण्यात आली आहे. आता यापुढील तपास जलदगतीने करत आयोगास अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक,सोलापूर यांना देण्यात आले आहेत. सुशिक्षित कुटुंबातील, रुग्णसेवेत कार्यरत असणाऱ्या आरोपी व्यक्तीचे असे वर्तन अत्यंत निंदनीय आहे. डॉ.ऋचा पाटील पाटील यांना न्याय मिळवून देण्यासाठी आयोग पाठपुरावा करेल," असे रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.  
 

Web Title: Solapur Dr Richa Rupner husband and father in law arrested in death case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.