सोलापूरातील यंत्रमाग कारखानदारांचा बंद, अठरा दिवसांत ७० कोटींचा फटका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 03:32 PM2017-10-25T15:32:55+5:302017-10-25T15:36:36+5:30
सोलापूर दि २५ : ईपीएफच्या विरोधात यंत्रमागधारकांनी पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे मागील अठरा दिवसांत चादर आणि टॉवेल निर्मितीच्या उद्योगाला ७० कोटींचा फटका बसला आहे.
महेश कुलकर्णी
सोलापूर दि २५ : ईपीएफच्या विरोधात यंत्रमागधारकांनी पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे मागील अठरा दिवसांत चादर आणि टॉवेल निर्मितीच्या उद्योगाला ७० कोटींचा फटका बसला आहे. कामगार आणि मालक यांच्यातील संघर्ष पहिल्यांदाच नसून गेल्या ४५ वर्षांत तब्बल सात वेळा विविध मागण्यांसाठी संप करण्यात आला आहे.
वेगवेगळे युनिट क्लब करून त्यांना ईपीएफ लागू करण्याचा निर्णय भविष्य निर्वाह निधी आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे यांनी जुलैअखेरीस दिला. या निर्णयाला यंत्रमाग कारखानदारांनी जोरदार विरोध केला. आॅगस्टमध्ये सहा दिवस आणि आॅक्टोबरमध्ये अठरा दिवस असा एकूण २४ दिवस हा उद्योग बंद ठेवला. ७ आॅक्टोबरपासून सुरू झालेला हा संप दिवाळी संपून गेली तरीही सुरू असून, यावर तोडगा अद्याप न निघाल्याने चादर आणि टॉवेल निर्मिती करणाºया उद्योगाला गेल्या अठरा दिवसांत सुमारे ७० कोटींचा फटका बसला आहे.
दररोज साधारण ४ कोटींची उलाढाल असणाºया या उद्योगाची वार्षिक उलाढाल साधारण १५०० कोटी रुपयांच्या आसपास आहे. आखाती देश, जर्मनी, उत्तर अमेरिका, श्रीलंका, नेपाळ या देशांमध्ये सोलापुरी टॉवेलची मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते. येथे तयार होणाºया मालापैकी ४०% माल हा परदेशात निर्यात तर उर्वरित मालाला इतर राज्यातून मागणी असते. चादर बनविणारे साधारणत: १५० ते २०० कारखाने आहेत तर टॉवेल बनविणारे ६५० ते ७०० कारखाने येथे चालतात. साधारण ४५ हजार कामगार या उद्योगात काम करतात.
गेले अठरा दिवस हा उद्योग पूर्णपणे बंद आहे. हा काही पहिलाच संप नाही. या आधीही असे अनेक संप झाले आहेत. काही वेळा कामगार संघटनांच्या मागण्यांसाठी तर काही वेळा कारखानदारांच्या मागण्यांसाठी बंद झालेले आहेत. परंतु मालक संघटनेच्या वतीने १८ दिवसांचा बंद पहिल्यांदाच झाला आहे. १९७२ साली यंत्रमाग कामगारांनी पहिल्यांदा बंद पुकारला. कामगारांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेला हा संप २३ दिवस चालला. यानंतर ८४ साली असाच कामगारांनी संप पुकारला. तो ५३ दिवस चालला. यानंतर आतापर्यंत सुमारे सात वेळा मोठे संप झाले.
-----------------------
- १९७२ - २३ दिवस (कामगारांच्या मागण्या)
- १९८० - ८ दिवस (कामगारांच्या मागण्या)
- १९८२ - पाच दिवस (कामगारांच्या मागण्या)
- १९८४ - ५३ दिवस (किमान वेतनाची मागणी)
- १९९३ - दोन दिवस (कामगारांच्या मागण्या)
- २०१३ - दोन दिवस बंद (कामगार कल्याण मंडळाला कारखानदारांचा विरोध)
- २०१७ - २४ दिवस बंद (कारखानदारांचा ईपीएफला विरोध)