चारा घेऊन जाणारा शेतकरी वाहनाच्या धडकेत जखमी
By दिपक दुपारगुडे | Published: June 1, 2024 07:38 PM2024-06-01T19:38:54+5:302024-06-01T19:39:12+5:30
शेतकऱ्याला पंढरपूरकडून येणाऱ्या अनोळखी वाहनाची जोरात धडक बसली
सोलापूर : चारा घेऊन दुचाकीवरुन निघालेला शेतकरी अनोळखी वाहनाच्या धडकेने गंभीर जखमी झाला. बिभीषण हंबेराव (वय ४५, रा. अजनसोंड, ता. पंढरपूर) असे जखमी शेतक-याचे नाव असून हा अपघात शनिवार, १ जून २०२४ रोजी दुपारी ३ वाजेदरम्यान झाला.
बिभीषण हंबेराव हे शेतातून चारा घेऊन दुचाकी (एम.एच. १३/ ए.क्यू. ५६०९) वरून अजनसोंडकडे निघाला होता. तिर्हे मार्गे पंढरपूर-सोलापूर रस्त्यावरून येताना पंढरपूरकडून येणाऱ्या अनोळखी वाहनाची जोरात धडक बसली. या अपघातात बिभीषण हंबेराव यांच्या डोक्याला, चेहऱ्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाले. अपघातानंतर अनोळखी वाहन न थांबता चालकाने दामटून नेले. मात्र, त्या वाहनाची नंबरप्लेट तुटलेल्या अवस्थेत घटनास्थळी दिसून आली. रस्त्याच्या बाजूला काटेरी झुडपी वाढली असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. ती त्वरित हटवण्याची मागणी होत आहे.