Solapur: २० नोव्हेंबरपासून साेलापूर विद्यापीठाच्या परीक्षा, २५ हजार परीक्षार्थी
By संताजी शिंदे | Published: November 9, 2023 06:54 PM2023-11-09T18:54:48+5:302023-11-09T18:55:47+5:30
Solapur University Exams: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदवीच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांना २० नोव्हेंबर २०२३ पासून सुरुवात होणार आहे. शहर व जिल्ह्यातील ३५ केंद्रांवर परीक्षा होणार असून २५ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
- संताजी शिंदे
सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदवीच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांना २० नोव्हेंबर २०२३ पासून सुरुवात होणार आहे. शहर व जिल्ह्यातील ३५ केंद्रांवर परीक्षा होणार असून २५ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. २० नोव्हेंबर पासून बीए, बीकॉम, बीएससी, बीबीए, बीसीए या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांना प्रारंभ होणार आहे. शहर व जिल्ह्यातील विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयाच्या केंद्रावर या परीक्षा होणार आहेत. सुमारे २५ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्याची व्यवस्था ही परीक्षा विभागाकडून करण्यात आली आहे. पदवीच्या परीक्षा पार पडल्यानंतर डिसेंबरमध्ये पदव्युत्तर, इंजिनिअरिंग, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरुवात होईल. त्या अभ्यासक्रमांचे वेळापत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
यंदा पदवीच्या प्रथम वर्ष अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे असेसमेंट (उत्तरपत्रिका तपासणी व मार्क अपलोड करणे) महाविद्यालय स्तरावर होणार आहे. मात्र वेळापत्रक जाहीर करणे, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका विद्यापीठाकडूनच देण्यात येणार आहे. प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षा या ज्या-त्या महाविद्यालयातच होणार आहे. उत्तरपत्रिका तपासणी व मार्क विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे हे महाविद्यालय स्तरावर होणार असल्याने निकाल देखील लवकर जाहीर होणार असल्याचे प्रभारी परीक्षा संचालक डॉ. मलिक रोकडे यांनी सांगितले.
एकूण तीन सत्रामध्ये परीक्षा होतील. याचबरोबर कॉपीसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी भरारी पथकांची देखील विद्यापीठाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करूनच परीक्षेला सामोरे जावे.
- प्रा. डॉ. प्रकाश महानवर, कुलगुरू