Solapur: व्हिडीओ गेम पार्लरमध्ये जुगाराचा अड्डा, चार ठिकाणी धाड अन तीन लाखांचे साहित्य जप्त
By दिपक दुपारगुडे | Published: June 7, 2023 08:44 PM2023-06-07T20:44:01+5:302023-06-07T20:44:56+5:30
Solapur: बार्शी शहरातील वाढत्या गुन्हेगारीस रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून व्हिडीओ गेम पार्लरच्या नावाखाली जुगार चालू असलेल्या चार ठिकाणी पोलिसांनी धाडी टाकून त्यात तीन लाखांचे साहित्य व रोख १५०० रुपये जप्त केले.
- दीपक दुपारगुडे
सोलापूर : बार्शी शहरातील वाढत्या गुन्हेगारीस रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून व्हिडीओ गेम पार्लरच्या नावाखाली जुगार चालू असलेल्या चार ठिकाणी पोलिसांनी धाडी टाकून त्यात तीन लाखांचे साहित्य व रोख १५०० रुपये जप्त केले. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
बार्शी शहरात पोलिस पेट्रोलिंगचे काम सुरू असताना याची माहिती मिळताच सात जून रोजी सायंकाळी विविध ठिकाणी असलेल्या व्हिडीओ पार्लरमध्ये जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शहरातील पार्लरची माहिती काढून पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांना दिली. त्यांनी व पोलिस पथकांनी उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली छापे टाकून कारवाई केली. यामध्ये गांधी शॉपिंग सेंटरमध्ये, तेलगिरणी चौकातील भगवंत व्हिडीओ गेम पार्लर, सोमवार पेठेतील मनोरंजन व्हिडीओ पार्लर, तर कसबा पेठ येथील श्री गणेश व्हिडीओ पार्लरमध्ये छापा टाकताच हे प्रकार आढळून आले. तेव्हा तेथील साहित्य ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिस कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून संबंधित व्हिडीओ गेम चालक व जुगार खेळत असणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. त्यात गांधी शॉपिंग सेंटरमधील व्हिडीओ गेम पार्लरमधून किरण गोरे, दुकानाचे मालक धनाजी रामचंद्र कदम, भगवंत व्हिडीओ गेम पार्लरमधून ओंकार चव्हाण व दुकान मालक सुभाष कवठाळकर, तर सोमवार पेठेतील मनोरंजन व्हिडीओ पार्लरमध्ये रवी जाधव व दुकान मालक हर्षल वसंत रसाळ हे पोलिसांना आढळून आले व कसबा पेठेतील श्री गणेश व्हिडीओ गेम पार्लरमधून ओंकार गणेश कुलकर्णी व दुकान मालक अमोल धन्यकुमार नेटके हे आढळून आले. पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर घोंगडे, सचिन देशमुख, अविनाश पवार व अंकुश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलिस करत आहेत.