सोलापूरला मिळाले १९ हजार डोस महापालिकेच्या केंद्रात आज मिळणार लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 08:40 AM2021-04-25T08:40:22+5:302021-04-25T08:40:50+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
सोलापूर : पुणे आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून सोलापूर जिल्ह्यासाठी १९ हजाराचे डोस मिळाले आहेत. त्यामुळे रविवारी दुपारनंतर महापालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रावर लसीकरण सुरू होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यासाठी १७ एप्रिल रोजी लसीचा साठा आला होता. तीन दिवसाच्या सत्रानंतर लसीचा साठा संपला होता. त्यामुळे शुक्रवारपासून जिल्ह्यातील लसीकरण केंद्र बंद आहेत.
१ मेपासून अठरा वर्षाच्या पुढील सर्वांना लस देण्यात येणार आहे. त्यामुळे एक लाख डोसची मागणी करण्यात आली होती. पण आरोग्य विभागाकडून लसीचा मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याचे दिसून आले आहे. आरोग्य विभागाने शनिवारी रात्री 20 हजार डोस पाठवले आहेत. रविवारी सकाळी महापालिकेला येथील मोठा साठा दिला जाणार आहे, त्यानंतर ग्रामीण भागात लस पोहोचवली जाणार आहे. ग्रामीण भागातील लसीकरण मात्र सोमवारी सकाळी सुरू होणार असल्याचे समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी सांगितले.
शहर व जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे संसर्गापासून बचाव करण्यासाठी नागरिक आता मोठ्या संख्येने लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. पण त्यामानाने लसीचा साठा कमी पडत आहे. १ मे नंतर मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे, पण आरोग्य खात्याकडून लसीचा मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.