सोलापूर - गाजियाबाद फेसबूक लव्हस्टोरी अखेर पोलीस ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:00 PM2019-06-26T12:00:29+5:302019-06-26T12:02:29+5:30
पूर्वभागातील पोलीस विमानाने एका रात्रीत उत्तर भारतात दाखल !
सोलापूर: उत्तर प्रदेशातील गाजियाबादच्या एका तरुणाशी केवळ फेसबूकवरील फोटोवरुन सोलापूरच्या अल्पवयीन तरुणीचे प्रेम जुळले. त्यानंतर तो तरुण थेट सोलापुरात आला, त्याच्यासोबत ती तरुणीही रेल्वेने दिल्लीकडे गायब झाली. या तथाकथित अपहरणाचा शोध घेत सोलापूरचे पोलीस विमानाने एका रात्रीत दिल्लीत दाखल झाले. तब्बल आठ दिवस उत्तर भारतात वेगवेगळ्या गावांमध्ये मुक्काम ठोकत या पोलिसांनी अखेर या दोघांना उचलून सोलापुरात आणले.
‘सोलापूर-गाजियाबाद फेसबूक लव्हस्टोरी’ची अधिक माहिती अशी की, पूर्वभागातील साडेसतरा वर्षांची एक अल्पवयीन तरुणी बी.कॉम.च्या पहिल्या वर्गात शिकत होती. काही महिन्यांपूर्वी मोबाईलवर असलेल्या फेसबूकच्या माध्यमातून या तरुणीची उत्तर प्रदेशातील गाजियाबाद जिल्ह्याच्या एका तरुणाशी फ्रेंडशिप झाली. चॅटिंग सुरु झाले. एकमेकांना फोटोही पाठविण्यात आले. त्यानंतर एकमेकांना न पाहताच केवळ फोटोवरुन ‘फ्रेंडशिप’चे रूपांतर ‘लव्हस्टोरी’त झाले. दोघांनी एकमेकांना आपला मोबाईल क्रमांकही दिला. गुपचूपपणे दोघांमध्ये संवाद सुरू झाला. पंधरा दिवसांपूर्वी हा तरुण रेल्वेने सोलापुरात आला. ‘परीक्षेचा निकाल पाहून येते,’ असे सांगून ही तरुणीही घरातून बाहेर पडली. त्यानंतर दोघे सोलापूरच्या स्टेशनवर एकमेकांना भेटले. येथूनच रेल्वेने दिल्लीकडे रवाना झाले.
दुपारपर्यंत आपली मुलगी घरी आली नाही म्हटल्यानंतर घाबरलेल्या आई-वडिलांनी एमआयडीसी पोलिसांकडे धाव घेतली.
एक दिवस तिचा शोध घेण्यातच गेला. तिचा मोबाईलही बंद लागत होता. निकाल मनाविरुद्ध लागल्यामुळे तिने कदाचित चुकीचे पाऊल तर उचलले नाही ना, या शंकेपोटी पूर्वभागातील विहिरीही शोधण्यात आल्या. दरम्यान, तिच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन रेल्वे स्टेशन होते. तेव्हाच पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी तिच्या मोबाईलच्या इनकमिंग- आऊटगोर्इंगची हिस्ट्री काढली. त्यात एकाच क्रमांकावर ती सातत्याने बोलत राहिल्याचे स्पष्ट झाले. हा क्रमांक उत्तर प्रदेशातील एका तरुणाच्या नावावर असल्याचेही पोलिसांनी हुडकून काढले. त्यानंतर त्या नावाचा शोध पोलिसांनी फेसबूकवर घेतला. त्याच्या फ्रेंडलिस्टमध्ये ही तरुणी असल्याचे दिसताच सोलापूरचे पोलीस कामाला लागले. त्यांनी त्या तरुणाच्या मोबाईलचे लोकेशन हुडकून काढले. तो दिल्लीत असल्याचे समजताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी राहुल तोगे आणि शरद ओहोळ या दोन सहकाºयांना दिल्लीला पाठविले. पुण्याहून विमानाने हे दोघे एका रात्रीत दिल्लीत पोहोचले.
दिल्लीतील स्थानिक पोलिसांचे सहकार्य मिळत नसतानाही सोलापूरच्या या दोघांनी मोबाईल लोकेशनवरुन या दोघांचा शोध सुरु ठेवला. मात्र हे ज्या ठिकाणी पोहोचत, तेथून काही वेळांपूर्वीच हे दोघे गायब झालेले असायचे. याच काळात सोलापुरातील एका जवळच्या मैत्रिणीला या तरुणीचा अनोळखी क्रमांकावरुन कॉल आला. ‘आम्ही दोघे रजिस्टर मॅरेज करणार असून, त्यासाठी माझ्या आधारकार्डाचा नंबर हवाय. माझ्या घरी जाऊन गुपचूपपणे तो क्रमांक बघून मला सांग,’ असे या तरुणीने सांगितले.
रोज घरी येणाºया पोलिसांच्या वर्दळीमुळे या मैत्रिणीची हिम्मत काही झालीच नाही. उलट तिने ही घटना तिच्या आई-वडिलांना सांगितली. पर्यायाने ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. तेव्हा साळुंखे यांनी त्या अनोळखी क्रमांकाचे लोकेशन शोधून काढले. गाजियाबाद जिल्ह्यातील एका तालुक्याच्या ठिकाणी काम करणाºया स्टॅम्पव्हेंडरचा हा मोबाईल क्रमांक असल्याचे स्पष्ट झाले. हा संदेश दिल्लीस्थित तोगे अन् ओहोळ यांच्यापर्यंत पोहोचविला गेला. ते दोघे तत्काळ उत्तर प्रदेशातील त्या गावात पोहोचले. या ठिकाणी दोघांनी लग्न केल्याची माहिती हाती आली. येथेच त्या तरुणाच्या घरचा पत्ताही मिळाला. तेथून पोलीस कर्मचारी त्याच्या घरापर्यंत पोहोचले.
मात्र घरात दोघेही नव्हते. आई-वडील काहीच माहिती द्यायला तयार नव्हते. मिठाईचे दुकान असणारे हे कुटुंब सधन होते. याच छोट्याशा गावात तीन-चार दिवस दोन्ही पोलिसांनी गुपचूपणपणे मुक्काम ठोकला. अखेर एकेदिवशी हे नवदाम्पत्य घरी येताच पोलिसांनी दोघांना उचलले. मंगळवारी सायंकाळी या दोघांना सोलापुरात आणण्यात यश आले असून, कायदेशीर प्रक्रिया राबविण्याबाबत रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरु होती.
केवळ नवनव्या मोबाईल क्रमांकावरून शोध..
- पूर्वभागातील ही तरुणी नेमकी कुठे गायब झाली, याचा तपास सुरुवातीला काही दिवस लागतच नव्हता. मात्र तिच्या आऊटगोर्इंग कॉलवरून त्या तरुणाचा क्रमांक पोलिसांनी हुडकून काढला. तसेच त्याने आजपर्यंत संपर्क साधलेल्या गाजियाबादमधील वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून त्या तरुणाच्या नातेवाईकांचाही पोलिसांनी शोध लावला. गायब झालेल्या तरुणीने गाजियाबादमधील स्टॅम्पव्हेंडरच्या मोबाईलवरून मैत्रिणीला केलेला कॉलही पोलिसांना खूप फायद्याचा ठरला. तसेच सोलापुरातून निघून जाताना तरुणीचा मोबाईल रेल्वे स्टेशनवर बंद करून ‘आपण खूप हुशार आहोत,’ या भ्रमात उत्तर प्रदेशचा तरुण होता. मात्र सोलापूरच्या पोलिसांचे हात कुठपर्यंत पोहोचले आहेत, हे त्याला माहीतच नव्हते. त्याच्या प्रत्येक कॉलचा ट्रेस करत पोलीस अखेर गाजिबादपर्यंत पोहोचलेच.
आपली मुलगी मोबाईलवर कोणाकोणाशी संपर्कात असते, याकडे सर्वच पालकांचे बारीक लक्ष असले पाहिजे. आपली मुलं चांगली असली तरी सोशल मीडियावरील भूलभुलय्या त्यांना मोहात पाडू शकतो, हे पालकांनी विसरू नये. हेच या घटनेतून शिकायला हवे.
- बजरंग साळुंखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक