Solapur: ग्रामपंचायतींचे संगणक परिचालक संपावर ऑनलाइन कारभार ठप्प, नागरिक अडचणीत
By दिपक दुपारगुडे | Published: November 23, 2023 06:26 PM2023-11-23T18:26:44+5:302023-11-23T18:27:07+5:30
Solapur News: ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा मिळावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी पंढरपूर तालुक्यासह राज्यभरातील संगणक परिचालक १७ नोहेंबरपासून बेमुदत संपावर गेले आहेत.
- दीपक दुपारगुडे
सोलापूर - ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा मिळावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी पंढरपूर तालुक्यासह राज्यभरातील संगणक परिचालक १७ नोहेंबरपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे गावगाड्यातील कारभार ठप्प झाला असून नागरिकांना ग्रामपंचायतीकडील दाखले मिळत नसल्याने त्यांच्यापुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
मागील बारा वर्षांपासून ग्रामविकास विभागाने नेमून दिलेले काम ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक यांच्यामार्फत केले जात आहे. संगणकावरील सर्व प्रकारची कामे करावी लागत असतानाही त्यांना केवळ दहा हजार ९३० रुपये एवढेच तुटपुंजे मानधन दिले जात आहे, तेही कधीच वेळेवर मिळत नसल्याची संगणक परिचालकांची तक्रार आहे.
संगणक परिचालक अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करताहेत. अतिशय तुटपुंजे मानधन दिले जाते. विशेष म्हणजे शासनाने कोतवाल, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, मदतनीस या सर्वांचे मानधन वाढविले असताना आम्हीच काय पाप केले आहे कळत नाही. त्यामुळे राज्यभरातील संगणक परिचालक बेमुदत संपावर गेले असल्याचे करकंब येथील संगणक परिचालक फिरोज कोरबू यांनी सांगितले.