आॅनलाईन कर भरण्यासाठी सोलापूरकर सरसावले; सॉफ्टवेअर अपडेटअभावी नियोजन गडगडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 02:51 PM2019-02-08T14:51:44+5:302019-02-08T14:53:14+5:30
सोलापूर : महापालिकेच्या मिळकत कराचे डिजिटल पेमेंट केल्यास पाच टक्के कर सवलत देण्यात येईल, असे प्रशासनाने जाहीर केले आहे; ...
सोलापूर : महापालिकेच्या मिळकतकराचेडिजिटल पेमेंट केल्यास पाच टक्के कर सवलत देण्यात येईल, असे प्रशासनाने जाहीर केले आहे; मात्र महापालिकेच्या वेबसाईटवरील पेमेंट पेजवर अशी कोणत्याही प्रकारची सवलत मिळत नसल्याचा अनुभव अनेक नागरिकांना येत आहे. सॉफ्टवेअर अपडेट नाही. उद्या-परवा होईल, अशी उत्तरेही कर संकलन आणि संगणक विभागातून दिली जात आहेत.
महापालिकेने मिळकत कराची वसुली मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांना डिजिटल पेमेंटची सवय लागावी यासाठी मिळकतकराचे डिजिटल पेमेंट केल्यास पाच टक्के सवलत देण्याची घोषणा महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी जाहीर केली आहे.
माजी महापौर संजय हेमगड्डी यांनी गुरुवारी एका नागरिकाला १ लाख ७५ हजार रुपयांचे डिजिटल पेमेंट करण्यासाठी महापालिकेत पाठविले होते. आम्ही डिजिटल पेमेंट करतो. किती टक्के सवलत द्याल, असे त्यांनी विचारले. त्यावर कर संकलन आणि संगणक विभागातील अधिकाºयांनी सवलतीचे आदेश निघाले असले तरी सॉफ्टवेअर अपडेट झालेले नाही. उद्या-परवा होईल. त्यानंतर तुम्ही या, असे सांगितले.
शहर कर संकलन अधिकारी आर.पी. गायकवाड यांनी जीआयएसचे काम करणाºया सायबर टेक कंपनीच्या अभियंत्याला बोलावून घेतले. त्याने सवलतीचा प्रोग्राम अपडेट करण्यासाठी बरेच काम करावे लागेल. दोन-चार दिवसांत हे काम पूर्ण होईल, असे स्पष्टीकरण दिले.
यंत्रणेअभावी उद्दिष्ट पूर्ण करण्यात अडथळे
- घरोघरी जाऊन कर संकलन करणाºया कर्मचाºयांनी नागरिकांकडून धनादेश स्वीकारावे किंवा पॉस मशीनवर डेबीट, क्रेडिट कार्डद्वारे कर संकलित करावा, असे आदेश जून २०१८ मध्ये काढण्यात आले आहेत. रोखीने पैसे घेण्यास मनाई आहे. महापालिकेचे मुख्यालय, विभागीय कार्यालय येथे रोखीने पैसे स्वीकारले जात आहेत. कर संकलन कर्मचाºयांना शुक्रवारपासून शहरात पाठविण्यात येणार आहे. पण त्यांच्याकडे अद्यापही पॉस मशीन देण्यात आलेल्या नाहीत.
दंड माफीचा ठराव फेटाळला
- मिळकतकराची जास्तीत जास्त वसुली व्हावी यासाठी नोटीस फी, वॉरंट फी माफ करण्यात यावी, असा ठराव सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला होता. हा ठराव आयुक्तांनी मंजूर केलेला नाही. दंड माफ केल्यास नियमित कर भरणाºया नागरिकांवर अन्याय होईल. नागरिकांनी कोणत्याही दंड माफीची अपेक्षा न करता कर भरावा, असेही आयुक्त डॉ. ढाकणे यांनी सांगितले आहे. पण कोणत्याच प्रकारची सवलत मिळत नसल्याने कर भरण्यास प्रतिसाद मिळत नसल्याचे कर संकलन विभागातील अधिकारी सांगत आहेत.
जीआयएसचे काम अद्यापही अपूर्ण
सायबर टेक कंपनीकडून जीआयएससह डिजिटल पेमेंट, त्यावरील सवलत, मिळकतदारांच्या मोबाईलवर संदेश पाठविणे आदी कामे करून घेतली जात आहेत. डिजिटल पेमेंटबाबतची चाचणी उद्या करण्यात येणार आहे. दोन दिवसांत सवलत मिळायला सुरुवात होईल.
- त्रिंबक ढेंगळे-पाटील,
उपायुक्त, महापालिका