सोलापूर: महामार्ग बनले मृत्यूचे सापळे; वाहनांची गती उठली जीवावर
By Appasaheb.patil | Published: November 12, 2022 01:40 PM2022-11-12T13:40:57+5:302022-11-12T13:41:05+5:30
गत काही महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. असा एकही दिवस उगवत नाही की ज्या दिवशी अपघात झाला नाही.
सोलापूर : गत काही महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. असा एकही दिवस उगवत नाही की ज्या दिवशी अपघात झाला नाही. एखाद्या अपघातात सारे कुटुंबच नाहीसे झाल्याचे दिसते तेव्हा तेवढ्यापुरती हळहळ व्यक्त केली जाते. नंतर जगाचे, जगण्याचे रहाटगाडगे सुरूच राहते. परंतु अपघातात ज्यांचे प्राण गेले त्यांचे काय? त्यांच्या कुटुंबियांचे काय? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
रस्ते दुहेरी, चार पदरी, सहा पदरी, आठ पदरी असे प्रशस्त झाले आहेत. आणखीन काही रस्ते होत आहेत. त्यावरून सुसाट अगदी प्रमाणापेक्षा जास्त वेगाने वाहने चालविली जात आहेत. चांगल्या रस्त्यांमुळे अफाट प्रगती झाली असली तरी कदाचित तीच नेमकी काळरात्र ठरत असावी असे बोलले जात आहे. अपघात केवळ राष्ट्रीय महामार्गावरच होतात असे नाही तर लहान-मोठ्या रस्त्यावरही होतात. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणा-यांचे प्रमाण अधिक आहे. शिवाय अपघातांमुळे अनेकांना अपंगत्वही आले आहे.
आकडेवारीवर एक नजर...
जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत
एकूण अपघात - ८४५
एकूण मयत - ४९२
एकूण जखमी - ९३६
यामुळे होतात अपघात...
-वाहनचालकांचा हलगर्जीपणा
-भरधाव वेग
-ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न
-नशा करून वाहन चालविणे
- नियमांचा भंग करणे
स्पीड लिमिट तोडणाऱ्यांना लाखांचा दंड
महामार्गावर नियमापेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणार्या वाहनांना दंड केला जातो. यासाठी ग्रामीण पेालिसांकडून महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांचे पथके तैनात करण्यात आले आहेत.
वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. वेगात वाहने चालवू नये. शक्यतो रात्रीच्या वेळी प्रवास टाळावा, वेगाच्या मर्यादेचे पालन करावे, सीटबेल्टचा वापर करावा. नागरिकांनी अपघातातील जखमींना उपचारासाठी हलविण्यासाठी मदत करावी. वाहने सावकाश चालवा, वाहतूक नियमांचे पालन करा.
-महेश स्वामी,
पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, सोलापूर ग्रामीण.