Solapur: सोलापूर जिल्ह्यातील १६६ गावात जलयुक्त शिवार; १३१ गावातील शिवारफेरी पूर्ण
By Appasaheb.patil | Published: May 5, 2023 02:44 PM2023-05-05T14:44:28+5:302023-05-05T14:44:57+5:30
Jalyukt Shivar: जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्ह्यातून निवडण्यात आलेल्या १६६ पैकी १३१ गावांमध्ये शिवारफेरी झालेली असून अद्याप ३५ गावांमध्ये शिवारफेरी झाली नाही.
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर : जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्ह्यातून निवडण्यात आलेल्या १६६ पैकी १३१ गावांमध्ये शिवारफेरी झालेली असून अद्याप ३५ गावांमध्ये शिवारफेरी झाली नाही. संबंधित गावांमध्ये शिवार फेरी तात्काळ पूर्ण करून निवडलेल्या सर्व गावांचा गाव आराखडा आठवडाभरात सर्वोच्च प्राधान्याने तयार करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली.
जलयुक्त शिवार २ साठी गावे निवडून एक महिना पूर्ण झाला आहे. परिणामी गाव आराखडा तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. यासाठी जलसंधारण व कृषि विभागाकडून विविध पातळीवर काम सुरू आहे. येत्या आठवडाभरात, संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे बैठका घेऊन, सर्व संबंधित यंत्रणामध्ये समन्वय साधून, आराखडा पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. पुढील आठवड्यात जलयुक्त शिवार अभियानाविषयी बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत तालुकास्तरीय समित्यांनी, गाव आराखडा पूर्ण करून, जिल्हा समितीकडे मंजुरीस्तव सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिल्याचे कृषी अधीक्षक यांनी सांगितले. प्रारंभी डी. वाय. दामा यांनी शिवार फेरी व गाव आराखडा कामांचा तालुकानिहाय प्रगती आढावा सादर केला.