सोलापूरात खादी महायात्रा महोत्सव : सोलार चरख्याचा पायलट प्रोजेक्ट महाराष्टÑात पोहोचणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 02:24 PM2017-11-06T14:24:23+5:302017-11-06T14:27:19+5:30
विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील कस्तुरबा बचत गटाने दोन वर्षांपूर्वी सुरू केलेला सौरऊर्जेवरील खादी उत्पादनाचा प्रकल्प महाराष्टÑासाठी पायलट प्रोजेक्ट ठरला आहे. हा प्रकल्प आता महाराष्टÑभर सुरू करण्यासाठी सरकारचे प्रयत्न असून, प्रत्येक जिल्ह्यात हे युनिट सुरु करण्यासाठी आणि ग्रामोद्योगाच्या प्रोत्साहनासाठी महाखादी यात्रा सुरू आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ६ : विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील कस्तुरबा बचत गटाने दोन वर्षांपूर्वी सुरू केलेला सौरऊर्जेवरील खादी उत्पादनाचा प्रकल्प महाराष्टÑासाठी पायलट प्रोजेक्ट ठरला आहे. हा प्रकल्प आता महाराष्टÑभर सुरू करण्यासाठी सरकारचे प्रयत्न असून, प्रत्येक जिल्ह्यात हे युनिट सुरु करण्यासाठी आणि ग्रामोद्योगाच्या प्रोत्साहनासाठी महाखादी यात्रा सुरू आहे.
राजभवन ते राजभवन असा प्रवास असलेल्या या खादी महायात्रेचा शुभारंभ मुंबईच्या राजभवनातून नऊ आॅक्टोबर रोजी झाला. राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये ही महायात्रा फिरून २० डिसेंबरला नागपुरातील राजभवनात समारोप होत आहे. या अंतर्गत सोलापुरातही ही यात्रा पोहोचली असून, चार ते सहा नोव्हेंबर या काळात खादी ग्रामोद्योगासंदर्भातील प्रदर्शन सुरू आहे.
खादी व ग्रामोद्योगाला प्रोत्साहन देणे, खादी व ग्रामोद्योगाच्या वस्तू वापराबाबत जनजागृती करणे, मंडळ योजनांचा प्रचार करणे, खादी व मधउद्योग पाहण्याची संधी नागरिकांना देणे, महाखादी ब्रँडची प्रसिद्धी करणे आणि ग्रामोद्योगाच्या उत्पादनासाठी बाजारपेठ तयार करणे हा या महायात्रेचा उद्देश आहे.
-----------------------------
अमरावतीत १६ गावांत प्रकल्प
च्अमरावती जिल्ह्यातील १० तालुक्यांतील १६ गावांत हा प्रकल्प मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. कस्तुरबा खादी सोलार महिला समितीने हा प्रकल्प सुरु केला असून, त्यातून १६ गावांतील महिलांना रोजगार सुरू झाला आहे. या प्रकल्पांतर्गत १३० महिलांना प्रत्येकी ६५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले असून, महाराष्टÑ राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळाकडून प्रत्येकी १० हजार याप्रमाणे १३ लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. या १० तालुक्यांतून अनुसूचित जातीतील दारिद्र्यरेषेखालील २२० महिला असून, त्यांचे २२ गट कार्यरत आहेत. सूत कताई, उत्पादन आणि विक्री यातून या महिलांनी रोजगार शोधला आहे.
--------------------------
प्रदर्शनाला ४५० लोकांनी दिल्या भेटी
च्सोलापुरातील समाजकल्याण भवनात हे प्रदर्शन सुरू आहे. दीड दिवसात सुमारे ४५० नागरिकांनी भेटी दिल्या असून, पहिल्या दिवशी सुमारे ५५ हजार रुपयांच्या मालाची विक्री झाली. येथे १५ स्टॉल्स लावण्यात आले असून, महात्मा गांधींचा पारंपरिक चरखा ठेवण्यात आला आहे. सोबतच चरख्याचे प्रकार असून, त्यात तकली, बुक चरखा, बॉक्स चरखा, दोन स्प्रिंकलचा स्वावलंबन चरखा, सहा त्राकी अंबर चरखा, १० त्राकी सोलार चरख्यांचा यात समावेश आहे,असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी डी. एस. भोसले यांनी सांगितले.