सोलापूरचे नेते ठरविताहेत खासगी डॉक्टरांना खलनायक; टीका करण्यापेक्षा रुग्णांना मदत करा बनून स्वयंंसेवक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 11:52 AM2020-05-25T11:52:17+5:302020-05-25T11:55:23+5:30
होय.. डॉक्टर आम्ही सुद्धा; प्रायव्हेट हॉस्पिटल्स ओनर्स असोसिएशनची आक्रमक भूमिका; सरकारी धोरणांचेही केले ‘आॅपरेशन’
सोलापूर : कोरोना महामारीमुळे अवघे जग घाबरलेले आहे; त्याला डॉक्टर मंडळींनी घाबरणे हा काय गुन्हा आहे? डॉक्टरांनाही इतरांसारखे आजार होऊ शकतात. रुग्णांच्या संपर्कात राहणाºया डॉक्टर व परिचारिकांना तर कोरोनासारखा आजार होण्याचा धोका सर्वाधिक आहे; पण या स्थितीत डॉक्टरांना स्थानिक राजकीय पुढारी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून खलनायक ठरविले जात आहे. वस्तुत: सरकारच खासगी डॉक्टरांना वेगळे पाडत आहे. खरं तर खासगी डॉक्टरांवर टीका करण्यापेक्षा त्यांना रुग्णसेवेमध्ये स्वयंसेवक म्हणून मदत करणे अपेक्षित आहे. हे आवाहनही आम्ही करीत आहोत, अशा भावना सोलापूर प्रायव्हेट हॉस्पिटल्स ओनर्स असोसिएशनने व्यक्त केल्या आहेत.
खासगी डॉक्टरांच्या या संघटनेने या संदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी करून आपली भूमिकाही मांडली आहे. खासगी डॉक्टरांवर होणारी आगपाखड पाहता एखाद्या व्यक्तीला परस्पर गुन्हेगार ठरवून आपण शिक्षा देण्याची प्रवृत्ती उफाळून वर येत असल्याचे स्पष्ट होत आहे.
अलीकडील काळातील घटना पाहता काही ठिकाणी त्यांना स्वत:च्या घरचे जेवण रस्त्यावर बसून घ्यावे लागते. कोणी चांगला सल्ला देणाºया स्टाफ नर्सच्या वाहनांची मोडतोड, जाळपोळ करतो. या सगळ्या घटनांच्या मागे प्रचंड मोठे गैरसमज आणि पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन आहे, हा बदलणे गरजेचे आहे, असेही आवाहन संघटनेने केले आहे.
कोरोना व्हायरस हा पन्नाशीच्या पुढील वा अस्थमा,मधुमेह,उच्च रक्तदाब असलेल्यांना जास्त घातक आहे म्हणून या वर्गातील डॉक्टरांनी घरी राहणेच योग्य आहे; नाहीतर त्या डॉक्टरांच्या वैयक्तिक कुटुंबीयांची हानी होईलच; शिवाय समाजाचेही मोठे नुकसान यामुळे होणार आहे. खासगी डॉक्टरांकडे ‘पीपीई किट’ तसेच ‘एन ९५’ मास्क यांची कमतरता आहे. तसेच ते खूप महागडेही आहेत. परंतु या मास्क किंवा पीपीई किट्सचा जीएसटी माफ केलेला नाही किंवा या वस्तूंच्या किमतीवर नियंत्रण ठेवलेले नाही.हा एक मोठा विरोधाभास आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.
प्रशासनाने हसे करून घेतले !
- सोलापुरात हा खरे तर एक मोठा विनोद झाला आहे. २८ रुग्णालये बंद असल्याची नोटीस देऊन प्रशासनाने स्वत:चेच हसे करून घेतले आहे. याचाच अर्थ सोलापुरातील साधारणपणे इतर १७५ रुग्णालये या काळात सेवा देत आहेत, हे प्रशासनाने मान्य केले होते. ज्या २८ रुग्णालयांना नोटिसा दिल्या गेल्या होत्या, त्यापैकी सर्वच्या सर्व रुग्णालये ही सुरू असल्याचे सर्व्हेमध्ये निदर्शनास आलेले आहे. ज्या डॉक्टरांचे वय जास्त आहे किंवा ज्या डॉक्टरांना काही आजार आहेत त्यांनी मात्र त्यांचे दवाखाने बंदच ठेवलेले आहेत. कंटेन्मेंट झोनमधील हॉस्पिटल्स मात्र सरकारी आदेशानुसारच बंद आहेत. याशिवाय जनरल प्रॅक्टिस करणाºया डॉक्टरांचेही ५०% पेक्षा जास्त दवाखाने चालू आहेत, असेही पत्रकात म्हटले आहे.
प्रवाहात सामील करा !
- अजूनपर्यंत तरी खासगी डॉक्टरांच्या झूम मीटिंग्ज घेऊन त्यांना या महामारीच्या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन करण्यात आलेले नाही. बºयाच खासगी डॉक्टरांच्या मनामध्ये विशेष करून जनरल प्रॅक्टिशनर्सच्या मनात अनेक शंका आहेत. त्यांच्याकडे असलेल्या सुविधा अपुºया आहेत. त्यासंदर्भात योग्य ते मार्गदर्शन करून या रुग्णांच्या उपचाराच्या प्रवाहात या सर्वांना सामील करून घेणे गरजेचे आहे. जे दुर्दैवाने गेल्या दोन महिन्यात घडलेले नाही, असेही मत व्यक्त केले आहे.
विनाकारण वाद
- ज्या रुग्णास ताप आहे, धाप लागला आहे, सर्दी, खोकला आहे, अशा रुग्णांना फक्त सिव्हिल हॉस्पिटलला रेफर करणे हे प्रायव्हेट डॉक्टरकडून अपेक्षित आहे. अशा रुग्णांवर उपचार प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये करणे अपेक्षित नाही.कारण हे कोविड आजाराचे संशयित रुग्ण आहेत.गरजेप्रमाणे त्यांच्या घशातील द्रवाची तपासणी व लागणारे योग्य ते उपचार फक्त ठराविक सरकारने ठरविलेल्या हॉस्पिटलमध्येच होऊ शकतात. ही बाब हॉस्पिटल व डॉक्टरांपर्यंत पोहोचलेली आहे; परंतु सर्वसामान्यांना त्याची माहिती नाही.त्यामुळे ही लक्षणे असलेला रुग्ण हॉस्पिटलमधून परत पाठविल्यानंतर विनाकारण वाद उत्पन्न होत आहेत.
सेवा विस्कळीत का झाली?
- बºयाच हॉस्पिटलमध्ये किंवा क्लिनिकमध्ये स्टाफचा तुटवडा आहे. दुर्दैवाने डॉक्टरांना लागू केलेले नियम हे ब्रदर्स, सिस्टर्स, आया व वॉर्डबॉय यांना लागू करण्यात सरकार कमी पडत आहे. कोणतेही हॉस्पिटल व क्लिनिक चालविणे हे टीमवर्क आहे. ब्रदर्स, सिस्टर्स, आया, वॉर्डबॉय हेही या टीमचा महत्त्वाचा भाग आहेत. सध्याच्या गोंधळाच्या परिस्थितीचा फायदा घेऊन यापैकी अनेकजण दांड्या मारत आहेत. त्यामुळे अनेक हॉस्पिटलमध्ये कामाचा खोळंबा होत आहे. याशिवाय अनेक हॉस्पिटलमधील कर्मचारी हे कंटेन्मेंट झोनमध्ये राहत असल्याने कामाला येऊ शकत नाहीत.या सर्वांचा परिपाक हॉस्पिटलमधील सेवा विस्कळीत होण्यात झालेला आहे, असाही आरोप केला आहे.