तलाकनंतर पत्नीला नांदण्यास पाठवण्यासाठी सासूचा खून करणाऱ्या जावयास जन्मठेप
By विलास जळकोटकर | Published: June 19, 2024 07:03 PM2024-06-19T19:03:43+5:302024-06-19T19:03:53+5:30
जिल्हा न्यायालयाचा निकाल; १५ जणांच्या तपासल्या साक्षी
सोलापूर : वादातून घटस्फोट (तलाक) झालेल्या पत्नीला नांदण्यासाठी पाठवण्यासाठी सासूचा खून केल्याप्रकरणी जावयास जन्मठेप व १० हजार रुपयांचा दंडाची बुधवारी जिल्हा न्यायालयात ठोठावण्यात आली. प्रमुख न्यायाधीश एम. एस. आझमी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. मोहम्मद शरीफ उर्फ गुड्डू चाँदपाशा पटेल (वय- ३८, रा. अभिषेक नगर, अक्कलकोट रोड सोलापूर) असे आरोपीचे नाव असून, मुमताज हकीम पिरजादे (वय- ६०, संगमेश्वर नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) असे मयत सासूचे नाव आहे.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, यातील मयताच्या मुलीशी आरोपीचा दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. लग्ना नंतर आरोपी व मयताची मुलगी समरीन यांच्यात वादामुळे चार वर्षापूर्वी आरोपी व त्याच्या पत्नीने शहर काझी यांच्यामार्फत घटस्फोट (तलाक) घेतला होता.त्यानंतर मयताची मुलगी (आरोपीची पत्नी) फिर्यादी ॲड. सद्दाम हकीम पिरजादे (मयताचा मुलगा) याच्याच घरी राहत होती. घटनेनंतर आरोपी परत नांदायला ये म्हणून त्रास देत होता.
सदर घटनेदिवशी ४ ऑक्टोबर २०२१ रोजी यातील फिर्यादी वकील कामाकाजानिमीत्त कोर्टामध्ये गेले असता आरोपी सायंकाळी फिर्यादीच्या घरी लोखंडी रॉड घेऊन आला व त्याने तोडफोड करुन ‘मेरी सास को बाहर बुलाओ’ म्हणत समोर आलेल्या मयत मुमताजच्या डोक्यातभ रॉड मारुन पळून जाऊन एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे येथे स्वतः हजर झाला. उपचारादरम्यान मुमताज यांचा ६ ऑक्टोबर मृत्यू झाला. त्यांनतर फिर्यादी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास करुन पोलीसांनी न्यायालयामध्ये आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले.
सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी तर आरोपीच्या वतीने ॲड. बडेखान यांनी काम पाहिले. तपासिक अंमलदार म्हणून पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद कोर्ट पैरवी हवालदार प्रवीण जाधव यांनी काम पाहिले.
सीसीटीव्ही फुटेज सह महत्त्वपूर्ण साक्षी
खटल्यात एकूण पंधरा साक्षीदार तपासले. फिर्यादी, पंच, घटनास्थळचा पंचनामा, मयताचे कपडे, नेत्र साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपासिक अधिकारी, नोडल ऑफिसर व फोटो ग्राफर, पोलीस स्टेशनमधील सी.सी.टी.व्ही. फुटेज व आरोपीने दिलेली गुन्ह्याची कबुली महत्वाचे ठरले.
सरकार पक्षाचा युक्तीवाद
मयत मुमताज पिरजादे यांचा मृत्यू आरोपीने लोखंडी रॉडने डोक्यात जबर मारहाण केल्यामुळेच झाला आहे. त्यासाठी शवविच्छेदन अहवाल न्यायवैदयशास्त्र प्रयोगशाळेचा अहवाल, आरोपीचे अंगावर घटनेच्यावेळी असणाऱ्या कपडयावरील रक्ताचे डाग, जप्त हत्यार लोखंडी रॉड त्यावरील रक्ताचे डाग, मयताचा रक्त गट, निवेदन पंचनामा, पोलीस ठाणे येथे आरोपी स्वतःहून लोखंडी रॉड घेवून हजर झालेला सी.सी.टी.व्ही. फुटेज व इतर पंचनामे इत्यादी भक्कम पुरावा सरकारपक्षाच्या वतीने युक्तीवादातून न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला.