solapur lockdown; औषधे अन् वृत्तपत्रांसह अत्यावश्यक सेवाच राहणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 11:06 AM2020-07-15T11:06:19+5:302020-07-15T13:23:49+5:30
पोलीस आयुक्तांचा आदेश; वृत्तपत्र विक्रेत्यांना घरोघरी पेपर टाकण्यास आहे मुभा
सोलापूर : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या दहा दिवसांच्या संचारबंदीसाठी पोलीस प्रशासन पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. शहरातील सात पोलीस ठाण्यात पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासमवेत पोलीस कर्मचाºयांच्या बैठका पार पडल्या असून, ही संचारबंदी कडक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
१६ ते २६ जुलैदरम्यान शहरात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. हॉस्पिटल, मेडिकल, वर्तमानपत्रे आदी काही मोजक्याच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. मार्च, एप्रिल व मे या अडीच महिन्यात शहरामध्ये संचारबंदी होती. संचारबंदी उठवल्यानंतर हळूहळू बाजारपेठा, भाजीपाला व अन्य दुकानांना परवानगी देण्यात आली होती. मात्र या कालावधीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाऊ लागली आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि होणाºया मृत्यूचे प्रमाण लक्षात घेता जिल्हा प्रशासनाला सोलापुरात कडक संचारबंदीचा निर्णय घ्यावा लागला. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी मंगळवारी सात पोलीस स्टेशनला भेट देऊन कर्मचाºयांना सूचना दिल्या आहेत. पोलीस कर्मचाºयांकडून वारंवार पेट्रोलिंग केली जाणार आहे.
...गय केली जाणार नाही : पोलीस आयुक्त
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दहा दिवसांच्या संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. आदेशाचे उल्लंघन झाले तर संबंधितांवर कारवाई केली जाईल. उल्लंघन करणारी व्यक्ती कोणीही असो, त्याची गय केली जाणार नाही. हॉस्पिटल, मेडिकल, वृत्तपत्र विक्रेते, स्टॉलधारक व वर्तमानपत्रात काम करणारे कर्मचारी आदी काही मोजक्याच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही पूर्णपणे बंद राहणार आहे. कोरोना रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे.