सोलापूर लोकसभा मतदारसंघ; चार उमेदवार विधी शाखेचे; दोन पदव्युत्तर शिकलेले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 01:24 PM2019-04-06T13:24:38+5:302019-04-06T13:26:48+5:30
लोकमत विशेष - राजकीय आखाड्यात ‘शिक्षण’ ; कोणत्या मेरिटवर होते मतदान, मतदार देतात का राजकीय नेत्याच्या शिक्षणावर भर ?
राजकुमार सारोळे
सोलापूर : लोकसभा निवडणुकांसाठी सोलापूर मतदारसंघातून उभे असलेल्यांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का पन्नास टक्के असल्याचे चित्र आहे. १३ उमेदवारांपैकी अर्ध्या उमेदवारांचे शिक्षण पदवीपर्यंतदेखील झालेले नाही. तर सहाजण पदव्युत्तर पदवीधारक आहेत. राजकारणातील उच्चशिक्षितांचा टक्का वाढावा, अशी अपेक्षा विविध पक्षांमधील नेते अनेकदा व्यक्त करताना दिसून येतात. प्रमुख राजकीय पक्षांकडून उभे असलेले उमेदवार उच्चशिक्षित आहेत; मात्र लोकशाही मजबूत करण्यासाठी अपक्ष म्हणून उभे राहिलेल्यांमध्ये पदवीधरांचे प्रमाण कमी आहे.
निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या शिक्षणाचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकूण १३ उमेदवार रिंगणात आहेत. यातील ५0 टक्के उमेदवार हे पदवी किंवा पदव्युत्तर म्हणजे एलएलबी किंवा पीएच.डी. धारण केलेले उमेदवार आहेत. निवडणूक रिंगणातील उमेदवार कसा असावा, याविषयी प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
उच्चशिक्षितांकडून पुढाकारच नाही
उच्चशिक्षितांनी राजकारणात आले पाहिजे असा एक मोठा मतप्रवाह आहे. लोकशाहीत अपक्ष म्हणून आपले आव्हान उभे करण्यात पदवीधरांमध्ये उदासीनताच दिसून येत आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकूण ६ उमेदवार अपक्ष म्हणून उभे आहेत. यातील अवघे ३ उमेदवार पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण झालेले आहेत. इतर ३ उमेदवारांपैकी एकजण बारावी उत्तीर्ण आहे तर उर्वरित दोघे उमेदवार दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण आहेत. राजकीय पक्षांतील ८० टक्के उमेदवार हे पदवीधर आहेत.
विधी शाखेचे सर्वाधिक पदवीधर
एकूण पदवीधर उमेदवारांमध्ये विधी तसेच कला विषयांतील सर्वाधिक पदवीधर आहेत. एकूण पदवीधरांच्या तुलनेत ३0 टक्के उमेदवार हे विधी पदवीधर तर १५ टक्के उमेदवार हे कला विषयांतील पदवीधर आहेत. रिंगणात असलेल्या एकूण उमेदवारांच्या तुलनेत उच्च शिक्षितांचे प्रमाण पन्नास टक्के आहे.
मतदार देतात का राजकीय नेत्याच्या शिक्षणावर भर?
उमेदवार उच्चशिक्षित असणे गरजेचे
लोकसभेचा उमेदवार उच्चशिक्षित असणे गरजेचे आहे. केंद्र शासनाच्या योजना व संसदेत बोलणाºया व्यक्तींना आम्ही प्राधान्य देऊ. उमेदवाराच्या शिक्षणाचा आम्ही जरूर विचार करणारच.
— प्रांजल कोळी, सोलापूर
उमेदवारांचा बायोडाटा पाहून पुढचे ठरवणार
उमेदवार उच्चशिक्षित आहे की नाही हे आम्हाला त्यांचा बायोडाटा पाहिल्यावरच कळणार आहे. त्यामुळे आम्ही त्या उमेदवाराचा बायोडाटा पाहून उच्चशिक्षित आहे की नाही याची खातरजमा जरूर करणार.
—मुनाफ शेख, सोलापूर
उमेदवाराचा अभ्यास किती आहे हे महत्त्वाचे
नुसता उमेदवार उच्चशिक्षित असून उपयोगाचे नाही. त्याचा अभ्यास किती आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. संसदेत तोंड न उघडणारा उमेदवार काय कामाचा. त्याच्या वक्तृत्वशैलीवरून आम्ही पुढचे काय ते ठरवू.
—नेहा पुला, सोलापूर