सोलापूर लोकसभा निवडणुक ; स्पर्धेतील उमेदवारांवर बनसोडे यांचा आक्षेप..साबळे हे उपरे; तर महास्वामींचा दाखला बोगस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 15:55 IST2019-03-12T15:52:10+5:302019-03-12T15:55:02+5:30
सोलापूर : खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी भाजपतर्फे चर्चेत असलेल्या संभाव्य उमेदवारांबाबत संशय व्यक्त करून घरचा आहेर दिला आहे. ...

सोलापूर लोकसभा निवडणुक ; स्पर्धेतील उमेदवारांवर बनसोडे यांचा आक्षेप..साबळे हे उपरे; तर महास्वामींचा दाखला बोगस !
सोलापूर : खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी भाजपतर्फे चर्चेत असलेल्या संभाव्य उमेदवारांबाबत संशय व्यक्त करून घरचा आहेर दिला आहे. अमर साबळे हे उपरे आहेत तर गौडगावचे डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा बेडा जंगम हा जातीचा दाखला बोगस आहे असा आरोप केला आहे.
भाजपमध्ये सोलापूर लोकसभेच्या उमेदवारीवरून आता चांगलीच जुंपली आहे. सोलापूर लोकसभेसाठी अमर साबळे व डॉ. शिवाचार्य महास्वामी यांची नावे चर्चेत आहेत. पक्षांतर्गत आपल्या उमेदवारीला होणारा विरोध पाहून खासदार बनसोडे अधिकच संतापले आहेत. बनसोडे यांचा पत्ता कट करण्यासाठी लॉबिंग होत असल्याने आता उमेदवारीसाठी त्यांनीही दंड थोपटल्याचे दिसत आहे. पक्षाने उमेदवारी कोणाला देणार हे अद्याप स्पष्ट केले नसले तरी पुण्याचे खासदार अमर साबळे यांनी सोलापुरात वारंवार हजेरी लावल्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. पण ते उपरे आहेत अशा चर्चा सुरू झाल्यावर स्थानिक उमेदवाराचा शोध सुरू झाला. आता गौडगावचे डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
या दोन्ही नावांवर प्रतिक्रिया देताना खासदार शरद बनसोडे म्हणाले, भाजपामध्ये लोकशाही आहे व उमेदवारी मागण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. साबळे यांच्या बाबतीत मी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्यावर साबळे हे उपरे उमेदवार आहेत. त्यांच्याकडे कामासाठी आम्ही कसे जाणार, ते आम्हाला कधी भेटणार, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचे बनसोडे यांनी स्पष्ट केले आहे.
डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी हे तर आमचे गुरूवर्य आहेत, त्यांचा मी आदर करतो. पण त्यांच्याजवळ असलेले बेडा जंगम हे सर्टिफिकेट बोगस आहे. त्यामुळे ते भाजपाचे उमेदवार होऊच शकत नाहीत. या दोघांची अशी स्थिती असताना मलाच उमेदवारी मिळणार, असा दावा त्यांनी केला आहे.
मंद्रुपचे सरपंचपद का रद्द
- डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा दाखला वैध नाही, हे स्पष्ट करण्यासाठी खासदार बनसोडे यांनी मंद्रुपच्या सरपंचाचे उदाहरण दिले आहे. मंद्रुपचे सरपंच हिरेमठ भाजपचेच होते. पण त्यांनी सादर केलेला बेडा जंगम हा जातीचा दाखला जिल्हाधिकाºयांनी नाकारला. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयानेही महाराष्ट्रात बेडा जंगम अस्तित्वात नाही म्हणून हे प्रमाणपत्र नाकारले. त्यामुळे भाजप ही रिस्क पुन्हा घेणार नाही, असे बनसोडे यांचे म्हणणे आहे.