सोलापूर ‘लोकमत’ टीमनं मोजलं पाठीवरचं ओझं; सातवीतलं पोरगं पेलतंय आठ किलोचं दप्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 01:48 PM2018-12-03T13:48:09+5:302018-12-03T13:50:15+5:30
डॉक्टरांनी दिला इशारा : सावधान सोलापूरकरांनो.. तुमच्या लेकराच्या पाठीचा मणका धोक्यात
विलास जळकोटकर/ यशवंत सादूल
सोलापूर : शाळकरी मुलं आणि पाठीवरच्या दप्तराचं ओझं ही एक समस्याच झालीय. पालकांपासून ते मुलांपर्यंत साºयांचीच ही ओरड. गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलंय. पण याबद्दल कोणीच ठोस अशी उपाययोजना केली नाही. हे असंच चालत राहिलं तर तुमच्या लेकराचा मणका धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. लोकमत टीमनं मंगळवारी विविध शाळा, परिसरात केलेल्या आॅन दी स्पार्ट रिपोर्टमध्ये सातवीतलं पोरगं तब्बल आठ किलो वजनाचं दप्तर दररोज वाहून नेत असल्याचं धक्कादायक चित्र दिसून आलंय.
शाळकरी अन् चिमुकल्यांना दप्तराचं ओझं प्रमाणापेक्षा जास्त लादू नका, असे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिलेले असताना सोलापूर शहरात मात्र याच्या उलट प्रचिती प्रत्यक्ष पाहणीत आढळून आली. शिशू ते मोठ्या गटातील बच्चेकंपनी तर आपल्या चिमुकल्या हातांनी एकीकडं दप्तर सावरत दुसºया हातांनी वॉटर बॅग अशा दुडक्या चालीत वाकून शाळेत प्रवेश करताना दिसून आली. प्राथमिक अन् माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी तर सरकारने ठरवून दिलेल्या कोणत्याच निकषात आढळून नाहीत.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या आदेशात शालेय अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांनी करायचा अभ्यास व त्यांनी पाठीवर वागविण्याच्या दप्तराचे ओझे याविषयी केंद्राने ठरवून दिलेल्या निकषांनुसार राज्यांनी सर्व शाळांसाठी मार्गदर्शिका जारी करावी, असे सांगण्यात आले आहे. या नव्या आदेशात विद्यार्थ्यांच्या इयत्तेनुसार त्यांच्या दप्तराचे कमाल वजन किती असावे, याचे कोष्टकही ठरवून दिले आहे. दप्तराचे ओझे निष्कारण वाढेल, असे अन्य कोणतेही जास्तीचे साहित्य व पुस्तके शाळेत आणण्यास सांगितले जाऊ नये, असेही शाळांना सांगण्यात आले आहे.
शासनाने ठरवून दिलेल्या कोष्टकानुसार सोलापुरात काय स्थिती आहे, याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न लोकमतच्या चमूने केला. यामध्ये एखाद्दुसरा अपवाद वगळता बहुतांश शाळांमधील विद्यार्थी दप्तराच्या ओझ्यानं दबले गेल्याचे चित्र दिसून आलं. सकाळी ७ पासून ११.३० पर्यंत शहरातील विविध शाळांमध्ये रिक्षा, पालकांसमवेत दुचाकीवरून जाणाºया विद्यार्थी अन् त्यांच्या दप्तराचं ओझं प्रकर्षाने जाणवले.
किती होतं दप्तराचं ओझं...
- पहिली ते दुसरी- १.५ ते १.७५ किलो पहिली ते दुसरी
- तिसरी ते पाचवी - ३.५० ते ६.५ किलो
- सहावी - ५ ते ६.५ किलो
- सातवी - ६ ते ८ किलो
- आठवी ते नववी - ६.५ ते ८.५ किलो
असे आहेत निकष...
- - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या आदेशात इयत्ता १ ली ते २ रीच्या विद्यार्थ्यांसाठी १.५ किलो
- - इ. ३ ते ५ वी साठी २ ते ३ किलो
- - ६ वी ते ७ वी-४ किलो
- - ८ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांना ४.५ किलो
- - १० वीसाठी ५ किलोचे प्रमाण ठरवून दिले आहे.
- - यापैकी कोणत्याही वर्गातील विद्यार्थ्यांकडे हे प्रमाण आढळले नाही.
रोज एवढं वजन पेलवत मुलांची पायपीट
- सात रस्ता परिसरातील एका शाळेतील इयत्ता ७ वीतल्या विद्यार्थ्याला सकाळी ११.३० च्या सुमारास शाळेकडे जाताना हटकलं. पाठीवरचं ओझं पाहून लष्करजवळ एका तेलाच्या दुकानात त्याच्या दप्तराचं वजन केलं. चक्क ७.९८५ किलो वजन आढळलं.
- दररोज तो चालत हे दप्तराचं ओझं घेऊन जात असल्याचे तो म्हणाला. अशी स्थिती शहराच्या मध्यवर्ती असलेल्या अनेक शाळांमधील मुलांच्या बाबतीतही आढळून आली. कोठेच शासनाने ठरवून दिलेल्या वजनाचे प्रमाण दिसले नाही.
डॉक्टर म्हणाले.. मणक्याला बाक येऊ शकतो
- शाळकरी मुलांच्या पाठीवर प्रमाणापेक्षा दप्तराचं ओझं दीर्घकाळ राहिलं तर त्याच्या मणक्याला बाक येऊ शकतो. खांदा अन् मानेला अपाय येऊ शकतो. हा आजाराला निमंत्रण देण्याचाच भाग म्हणावा लागेल़ बदलत्या शिक्षणप्रणालीमध्ये मुलांनी शाळेमध्ये जाताना सोबत किती पाठ्यपुस्तके असावीत असा कोणताच दंडक नसल्याने ही स्थिती निर्माण झाली. मुलांच्या गुणवत्तावाढीसाठी नियमित अभ्यासक्रमाशिवायही जादा वर्ग सुरु झाले.
मुलं घरातून निघतानाच सर्व पुस्तके घेऊन जाऊ लागले. हे करताना मुलांच्या मानसिकतेचा विचार केलेला दिसत नाही. शाळेत पोहोचल्यावर सुरुवातीचे काही काळ त्याची स्थिती काय होईल याचाही विचार व्हायला हवा. शासनाने इयत्तेनुसार ठरवून दिलेले दप्तराचे वजन स्वागतार्ह आहे. पालकांनीही कटाक्षाने शाळेत जाताना आपल्या पाल्यांकडे लक्ष द्यावे. लहान वयात त्याला मणका, खांदा, पाठीचं दुखणं निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घ्यायला हवी. शाळा व्यवस्थापनही याबद्दल नक्कीच निर्णय घेतील, अशी अपेक्षा बालरोग तज्ज्ञ तथा शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
- - इयत्ता ३ री ते पाचवीच्या विद्यार्थ्यांकडं मात्र ३ किलो ते ५.५ किलोपर्यंत हे ओझं आढळलं. सहावीतल्या राणी पांढरे (नाव बदललेले) म्हणाली टीचरने दिलेला पाठ, अभ्यासाच्या तासानुसारची पुस्तके, डबा, पाणी बॉटल शाळेत न्यावी लागते. सायकलवरून शाळेत येताना अनेकवेळा पाठीवरचं दप्तराचं ओझं सावरताना गर्दीतून अनेकदा पडण्याची भीती वाटते. हे ओझं कमी झालं तर नक्कीच आम्हाला आनंद होईल, अशी बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली.
- - आठवीतली माधवी मठ म्हणते.. सरकारने दप्तराचं ओझं कमी करण्याचा निर्णय घेतला, तो खूप चांगला आहे. दररोज रिक्षानं शाळेत जाताना ओझं असलेलं दप्तर टपावर ठेवून लवकर खराब होतं. यामुळं आईबाबांचं बोलणं खावं लागतं आणि शिक्षकांनी सांगितलेलं दप्तर नाही आणलं तर त्यांचीही बोलणी खावी लागतात. आता सरकारनंच ओझं कमी करण्याचा निर्णय आम्हा मुला-मुलींसाठी त्रास कमी होणारा ठरेल, अशा भावना लोकमतच्या चमूशी बोलताना व्यक्त केल्या.
- - शहरातील विविध शाळांमध्ये शासनाच्या निर्णयाबद्दल विचारता त्यांनी स्वागत केलं. आम्ही पूर्वीपासूनच हा आदेश फॉलो करतोय, असं सांगण्यात आलं. प्रत्यक्षात मात्र विरोधाभास दिसून आला. काही शाळांच्या मुख्याध्यापक, व्यवस्थापनाने शासनाच्या आदेशाचा आदर करीत यापुढे तंतोतंत पालन केले जाईल, अशीही पुस्ती जोडण्यात आली.
पालकांचा संताप
- पाठीवरच्या दप्तराच्या या ओझ्याबद्दल पालकांना विचारता त्यांनी शाळा आणि शिक्षकांना दोष दिला. वारंवार याबद्दल विचारणा करताना त्यांनी अभ्यासासाठी हे लागतंच अशी उत्तरे ऐकायला मिळाल्याचं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं. अनेक पालकांनी शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करताना फार पूर्वीच हे करायला होतं, अशाही अपेक्षा व्यक्त केल्या. कायमस्वरूपी त्याची अंमलबजावणी व्हावी, अशीही मागणी महिला पालकांनी केली.