सोलापूर लोकसभा निवडणुक निकाल २०१९ : सोलापूर शहरात आज ११०० पोलिसांचा चोख बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 02:05 PM2019-05-23T14:05:05+5:302019-05-23T14:09:03+5:30
५६ ठिकाणी फिक्स पॉर्इंटबरोबरच मिश्रवस्त्यांमध्ये स्ट्रायकिंग फोर्सही तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी दिली.
सोलापूर: गत महिन्यात पार पडलेल्या सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे़ या काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मतमोजणी केंद्रासह शहरात विविध ठिकाणी ११०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ५६ ठिकाणी फिक्स पॉर्इंटबरोबरच मिश्रवस्त्यांमध्ये स्ट्रायकिंग फोर्सही तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली़
पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक होऊन मतमोजणी काळात तीन डीसीपी, सहा सहायक पोलीस आयुक्त, ६५ पोलीस निरीक्षक/सहायक पोलीस निरीक्षक, एक एसआरपी प्लाटून, सीआरपीएफची एक तुकडी असे नियोजन करण्यात आले आहे. मतमोजणी केंद्र असलेल्या रामवाडी शासकीय गोदामाच्या आतील परिसरात प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस उपायुक्त बापू बांगर आणि सहायक पोलीस आयुक्त दीपाली काळे कार्यरत आहेत. रामवाडी गोदाम बाहेरील परिसर ते जांबवीर चौक भागात पोलीस उपायुक्त मधुकर गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त रुपाली दरेकर, महावीर सकळे यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त असेल. उमेदवारांचे निवासस्थान, पक्ष कार्यालय फिक्स पॉइंट, मोठ्या हद्दीतील स्ट्रायकिंगची जबाबदारी संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे.
शहरातील सर्व बंदोबस्त व बॅरिकेडिंग आदीची जबाबदारी पोलीस उपायुक्त डॉ. शशिकांत महावरकर, सहायक आयुक्त वैशाली शिंदे यांच्याकडे असणार आहे.
सकाळी ६ वाजल्यापासून बंदोबस्त सुरू
- यापूर्वी रामवाडी गोदाम येथे ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेले सकाळच्या सत्रातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी सकाळी सहा वाजल्यापासून मतमोजणी बंदोबस्तासाठी असतील, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.
बीट मार्शलचा होणार उपयोग
याशिवाय २६ बीट मार्शल आणि ८ दामिनी पथक उद्या (२३ मे) सकाळी सहा वाजल्यापासून त्यांना नेमून दिलेल्या हद्दीत गस्त करतील व माहिती देतील. पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाºयांनी बीट मार्शलचा उपयोग करुन घ्यावा. याशिवाय बीट मार्शल आपापल्या हद्दीत सशस्त्र फिक्स पॉइंटला भेटी देऊन तपासणी करतील. पोलीस आयुक्तांसमवेतच्या बंदोबस्तात फौजदार, क्यूआरटी पथक आणि एक मिनीबस असणार आहे.