Solapur: कमी पावसाचा फटका भूजल पातळीला बसणार,भूजलाच्या नोंदी घेण्यास सुरुवात
By शीतलकुमार कांबळे | Published: September 21, 2023 02:11 PM2023-09-21T14:11:48+5:302023-09-21T14:12:15+5:30
Solapur: पावसाळ्याचे चार महिने पूर्ण होत आले आहेत. तरी देखील म्हणावा तसा पाऊस बरसला नाही. याचा परिणाम हा भूजल पातळीवर होत आहे. सध्या भूजल पातळीची तपासणी सुरु असून ऑक्टोबर महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे.
: ऑक्टोबर महिन्यात येणार अहवाल
- शीतलकुमार कांबळे
सोलापूर - पावसाळ्याचे चार महिने पूर्ण होत आले आहेत. तरी देखील म्हणावा तसा पाऊस बरसला नाही. याचा परिणाम हा भूजल पातळीवर होत आहे. सध्या भूजल पातळीची तपासणी सुरु असून ऑक्टोबर महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे.
भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून मे २०२३ मध्ये शेवटचे भूजल पातळी मोजण्यात आली होती. पाच वर्षांची तुलना केली असता जिल्ह्यातील पाण्याची पातळी ही ०.५८ मीटरने वाढली होती. आता पावसाळ्यानंतर पुन्हा एकदा भूजल पातळीचे निरीक्षण होणार आहे. याबाबतची माहिती ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार आहे.
मागील काही वर्षामध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला होता. मृदा जलसंधारणाचे काम चांगले झाले होते. त्यामुळे पडलेल्या पावसाचे पाणी बऱ्याच ठिकाणी अडले. मागील पाच वर्षांची तुलना करता जिल्ह्याच्या भूजल पाणी पातळीत अडीच फुटाने वाढ झाली होती. यंदाच्या वर्षी भूजल पातळी कमी झाल्यास शेती व पिण्यासाठी पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भूजल पातळी ही पावसावर अवलंबून असते. यंदाच्या वर्षी कमी पाऊस पडला आहे. जमिनीत म्हणावे तितके पाणी मुरले नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी भूजल पातळी खाली जाण्याची शक्यता आहे. याबाबतची निश्चित माहिती भूजल सर्व्हेक्षण केल्यानंतरच मिळेल.
- मुश्ताक शेख, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा