दारूमुळं संसार उद्ध्वस्त! नशेत बायकोची हत्या, अटकेच्या भीतीनं स्वत:लाही संपवलं, सोलापुरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 16:33 IST2025-04-10T16:27:52+5:302025-04-10T16:33:11+5:30
सोलापुरात दारुच्या नशेत एका व्यक्तीने पत्नीची हत्या करून स्वत:ही आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली.

दारूमुळं संसार उद्ध्वस्त! नशेत बायकोची हत्या, अटकेच्या भीतीनं स्वत:लाही संपवलं, सोलापुरातील घटना
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात किरकोळ वादातून दारुड्या पतीने पत्नीची हत्या करून स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच वैराग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बार्शीतील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर दोघांवर एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनाबाई वसंत पवार असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. वसंतला दारुचे व्यसन होते. त्यामुळे वसंत आणि सोनाबाई यांच्यात नेहमीच वाद होत असे. परंतु, मंगळवारी रात्री दोघांत झालेला वाद हा त्यांच्या आयुष्याला पूर्णविराम लावणारा ठरेल, याची कोणीही कल्पना केली नव्हती. घटनेच्या दिवशी वसंत दारू पिऊन घरी आला आणि किरकोळ कारणांवरून पत्नी सोनाबाई हिच्याशी वाद घालू लागला. हा वाद मिटण्याऐवजी इतका पेटला की, वसंतने सोनाबाईला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी घरात असलेल्या वसंतच्या वडिलांनी दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु, वसंतने त्यांनाही मारहाण केली. दोघांना जखमी अवस्थेत जमनीवर पडल्याचे पाहून वसंत घटनास्थळावरून पळून गेला. कालच्या मारहाणीत सोनाबाईचा मृत्यू झाल्याचे समजताच वसंतने दुसऱ्या दिवशी सकाळी घराजवळील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
वसंतने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना कळवले. या घटनेत वंसतच्या वडिलांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वसंतला दोन मुले आहेत. त्याचा एक मुलगा संभाजी पवार हा सोलापूर येथे आपल्या पत्नीसह राहतो. तर, दुसरा मुलगा राम पवार हा आई- वडिलांसह राहत होता. घटनेच्या दिवशी राम हा त्याच्या सासरवाडीला गेला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.