सोलापूर बाजारभाव; पावसाने ओढ दिल्याने भाज्यांची आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:28 PM2018-10-10T12:28:48+5:302018-10-10T12:29:55+5:30
दरात वाढ : सफरचंद, केळी आवक वाढली
सोलापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साबुदाणा, भगर, चिक्कू, सफरचंद, केळासह उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढली आहे. साबुदाण्याचा दर ^५० ते ७० रुपये किलो आहे तर खजुराचा खजुराचा किलोचा ८० ते ९० रुपयांच्या जवळपास झाला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाला आणि फळांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.
गतवर्षी खजुराचा दर ६० रुपयांपासून ते ६५ रुपये होता. तो यावर्षी ९० ते ९० रुपयांच्या घरात गेला आहे. केळीच्या भावातही २० टक्के भाववाढ झाली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाल्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर सुमारे ३० ते ४० टक्क्यांच्या आसपास वाढले आहेत.
कोथिंबीर पेंढीचा दर हा २५ ते ३० रुपये असा आहे. बटाटे आणि वांगे या भाज्यांचे दर ४० ते ५० रुपये किलो झाले आहेत. महिन्यापूर्वी हेच दर १० ते २० रुपये किलो होते.
नवरात्रोत्सवात फळांना ग्राहकांची जास्त मागणी जास्त होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत चिक्कूचा प्रतिकिलो दर ३० ते ४० रुपयांचा दर या आठवड्यात ५० रुपयांच्या घरात गेला आहे. सफरचंदची आवकड वाढल्याने दर ८० ते १०० रुपये प्रतिकिलो, मोसंबीचे ६० रुपये किलो, डाळींब ४० रुपयाला किलो असे भाव आहेत.
कांदा, बटाटा आवक घटली...
पावसाने ओढ दिल्याने कांदा, बटाटा, वांग्यांसह पालेभाज्यांची आवड घटली आहे. याचा परिणाम दरांवर झाला आहे. पंधरा दिवसांपूर्वी असलेल्या दरापेक्षा ५० टक्के दर सध्या भाज्यांचे वाढलेले आहेत. विशेषत: कांदा, बटाटा आणि वांगे या तीन भाज्या अधिक महाग झाल्या आहेत.
फुलांचे भाव
झेंडू - ४०-५० रुपये किलो
शेवंती - १५० रुपये किलो
गुलाब - ९० रुपये किलो
नवरात्रोत्सवात भाज्या, फळे आणि फुलांची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. नेहमी पडणारा परतीचा पाऊस शहर आणि जिल्ह्यात न पडल्यामुळे भाज्या आणि फुलांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. परिणामी या वस्तूंचे दर वाढले आहेत.
- श्रीशैल घुली,
भाजी आणि फूल विक्रेते.