Solapur: माऊलींच्या पालखीचे चंद्रकांत पाटलांनी केले सारथ्य; पालखीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी
By Appasaheb.patil | Published: July 11, 2024 03:37 PM2024-07-11T15:37:35+5:302024-07-11T15:39:10+5:30
Solapur News: आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखीचे स्वागत करून माऊलीच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले.
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखीचे स्वागत करून माऊलीच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले.
दरम्यान, धर्मपुरी येथे पालखी स्वागतानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माऊलीच्या रथाचे सारथ्य केले. रथामध्ये त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते. पालखी स्वागतानंतर प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधीनी हरी नामाचा गजर करीत पालखी सोहळ्याबरोबर काही अंतर गेले. सोलापूर जिल्ह्यातील पालखी प्रवेशानंतर माऊलींची पालखी पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृह येथे विसाव्यासाठी थांबली असता पालखीच्या दर्शनासाठी परिसरातील वारकरी भाविक व ग्रामस्थांनी अलोट गर्दी केली होती. धर्मपुरी येथे विसावा घेतल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलीची पालखी नातेपुतेकडे मार्गस्थ झाली.
सोलापूर जिल्ह्यात माऊलींच्या पालखीचे आगमन सकाळी धर्मपुरी बंगला येथे झाले. तत्पूर्वी, सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र दुद्दी, मुख्य कार्यकारी अधिकारी यासणी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी माऊलींच्या पालखीला निरोप दिला.