सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिले आयुक्त अविनाश ढाकणे यांना पेढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 08:01 PM2018-04-05T20:01:57+5:302018-04-05T20:01:57+5:30
मनपाने सादर केलेल्या ६९२ कोटीच्या समांतर जलवाहिनी मंजूर झाल्याचा आनंद
सोलापूर : मनपाने सादर केलेल्या ६९२ कोटीच्या समांतर जलवाहिनीला शासनाने मंजुरी दिल्याच्या आनंदप्रित्यर्थ महापौर शोभा बनशेट्टी यांनी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना गुरूवारी सायंकाळी पेढे देऊन आनंद व्यक्त केला.
शनिवार दि. ३१ मार्च रोजी सभा तहकुब झाल्यावर महापौर बनशेट्टी या आयुक्तांवर भडकल्या होत्या. त्यांच्या वक्तव्यामुळे महापालिकेतील वातावरण ढवळून निघाले होते. या प्रकारानंतर आयुक्त डॉ. ढाकणे बैठकांसाठी मुंबई व दिल्लीला गेले होते. गुरूवारी ते परत आले. सायंकाळी ६ वा. ते आपल्या कार्यालयात कामकाज करीत असतानाच महापौर शोभा बनशेट्टी, सभागृहनेते संजय कोळी, नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, नागेश वल्याळ, किसन जाधव, श्रीशैल बनशेट्टी, सुभाष शेजवाल आदी त्यांच्या कार्यालयात आले. महापौर बनशेट्टी यांनी आयुक्त डॉ. ढाकणे यांना समांतर जलवाहिनीला मंजुरी मिळाली का असा सवाल केला. त्यावर आयुक्त डॉ. ढाकणे यांनी अद्याप तरी तसे पत्र आलेले नाही.
मनपाने नगरविकास खात्याला दिलेला हा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणा केल्यामुळे याबाबत दोन दिवसात अद्यादेश निघणे अपेक्षित असल्याचे सांगितले. या आनंद प्रित्यर्थ महापौर बनशेट्टी यांनी आयुक्त डॉ. ढाकणे, उप आयुक्त त्रिंबक ढेंगळे—पाटील व उपस्थितांना पेढे वाटून महत्त्वाकांक्षी योजना मार्गी लागत असल्याबाबत आनंद व्यक्त केला.
गुरूवारी दुपारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी समांतर जलवाहिनीला शासनाची मंजुरी मिळाली आहे.
दोन दिवसात निविदा निघण्याची शक्यता आहे असे वक्तव्य केले होते. ही वार्ता कानी आल्यावर महापौरांसह इतर सर्वांनी आयुक्तांकडे धाव घेतली. पालकमंत्री देशमुख यांनी त्यांच्या गोटातील नगरसेवकांनाही ही बाब सांगितली नाही हे विशेष. पण समांतर जलवाहिनी मंजुरीच्यानिमित्ताने महापालिकेत पदाधिकारी व अधिकाºयांमध्ये निर्माण झालेला तणाव दूर होण्यास मदत झाली असे म्हटल्यास वावगे ठरू नये.