सोलापूर दूध संघाला १४ लाखांचा नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 04:14 PM2018-08-14T16:14:30+5:302018-08-14T16:17:31+5:30
स्पर्धेतही मिळविला फायदा : गत नुकसानीमुळे अद्यापही संघ ७ कोटी तोट्यात
सोलापूर : शासनाचे दूध दराबाबतचे धरसोड वृत्तीचे धोरण तसेच खासगी संघाशी स्पर्धा करताना होणारी दमछाक अशा अवस्थेतही सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला मागील आर्थिक वर्षात १४ लाख २२ हजार ३७४ रुपये नफा झाला असला तरी मागील वर्षी (२०१५-१६) चे नुकसान भरुन संघ ६ कोटी ९८ लाख २२६ रुपये तोट्यात आहे. मात्र काटकसरीच्या कारभारातून बरीच बचत केल्याचे नफा-तोटा पत्रकावरुन दिसून येत आहे.
सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा २०१७-१८ चे ताळेबंद तयार झाला असून शुक्रवारी दिनांक १७ आॅगस्ट रोजी मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. मागील दोन-तीन वर्षांत राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे दूध उत्पादनाबाबतचे धोरण अक्षरश: शेतकरी व सहकारी दूध उत्पादक संघाचे मरण ठरत आहे. पशुसंवर्धन खात्याचे मंत्री व सचिव केवळ आदेश काढून मोकळे होत असून त्याची अंमलबजावणी होत नसताना खासगी संघापुढे हतबल होताना दिसत आहेत.
दूध दर वाढीबाबतचे शासनाचे आदेश केवळ सहकारी संघासाठी बंधनकारक असून खासगी संघ मात्र हे आदेश नाकारत आहेत. या स्थितीमुळे सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. खासगी संघांनी मागील वर्षभरात दूध दर कमी करण्याचे आठ वेळा दरपत्रक काढले आहे. सहकारी संघांना मात्र शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे(किमान ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ) दूध दर द्यावा लागतो.
यामुळे सोलापूरसह राज्यातील सहकारी संघ अडचणीत आले आहेत. अशा स्थितीतही सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाला काटकसरीच्या कारभारामुळे १४ लाख २२ हजार ३७४ रुपयांचा नफा झाला आहे. मागील वर्षी संघाला ७ कोटी १२ लाख ४९ हजार ५९९ रुपयांचा तोटा झाला होता. मागील वर्षीचा तोट्याचा मोठा खड्डा भरणे शक्य नसले तरी यावर्षीचा नफा मागील वर्षीच्या तोट्यात जमा झाला आहे.
रुपये ५१ लाख वाचले
सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाला मार्च २०१७ मध्ये ४३ कोटी ४९ लाख ७७ हजार ४४१ रुपये कर्ज होते. काटकसर व सर्वच बाबीवरील खर्च कमी केल्याने संघाची कोणतीही मालमत्ता विक्री न करता हे कर्ज मार्च २०१८ मध्ये २८ कोटी ९३ लाख ६२ हजार ५२८ रुपये इतके राहिले आहे. अधिक व्याज असलेले कर्ज भरुन कमी व्याजदराने एच.डी.एफ.सी. बँकेचे कर्ज संघाने काढले आहे. व्याज कमी दराने द्यावे लागल्याने वर्षभरात दूध पंढरीचे ५१ लाख ६ हजार ६१४ रुपये वाचले असल्याचे सांगण्यात आले.
१६-१७ मध्ये कर्मचाºयांनी राजीनामे दिल्याने संघावर मोठा आर्थिक भार पडला होता. तो यावर्षी कमी झाला आहे. बँकेचे कर्ज व व्याजही कमी द्यावे लागल्याचाही संघाला फायदा झाला. जुलैअखेर दूध पंढरीवर अवघे २२ कोटी कर्ज आहे.
- आ. प्रशांत परिचारक,
चेअरमन, सोलापूर जिल्हा दूध संघ