सोलापूरचे खासदार जयसिध्देश्वर महाराजांचा जातीचा दाखला हरविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 06:39 PM2020-02-27T18:39:01+5:302020-02-27T18:40:19+5:30
वळसंग पोलीस ठाण्यात दिली तक्रार; खासदारकी वाचविण्यासाठी महाराजांची धडपड सुरू
सोलापूर : सोलापूर भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांचे बेडा जंगम जात प्रमाणपत्र हरवल्याचे आता समोर आले आहे़ याबाबत वळसंग पोलिस ठाण्यात १४ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल करण्यात आल्याचे त्यांचे वकील संतोष नावकर यांनी सांगितले़ त्यांचे शिष्य हे प्रमाणपत्र घेऊन सोलापूरकडे येत असताना कुंभारीजवळ हा दाखला हरवल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
विशेष म्हणजे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर यांच्या जात प्रमाणपत्राविरुद्ध जिल्हा जात पडताळणी समितीसमोर दाखल झालेल्या तक्रारीच्या सुनावणीवेळी तक्रारदाराने मूळ जात प्रमाणपत्र समितीसमोर हजर करावे अशी मागणी केली होती, त्यावेळी अॅडवोकेट संतोष नावकर यांनी तक्रारीबाबत मुंबई उच्च न्यायालयात अपील केल्याने अपिलासोबत मूळ दाखला जोडल्याचे सांगितले होते, त्यानंतर जात पडताळणी समितीसमोर अंतिम सुनावणी होईपर्यंत हा दाखला आणला गेलाच नव्हता़ जात पडताळणी समितीने बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र अवैद्य ठरवल्यानंतर आत्ता त्यांचे मूळ जात प्रमाणपत्र हरवल्याचे समोर येत आहे.
जात पडताळणी समितीसमोर सुनावणी सुरू असतानाच उच्च न्यायालयातून हा दाखला काढून घेतला होता, त्यानंतर तो समितीसमोर दाखल करण्यात येण्यापूर्वीच हा दाखला हरवल्याचे न्हावकर यांनी म्हटले आहे़ जात पडताळणी समितीने दिलेल्या निकालाविरुद्ध खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे.