सोलापूर मनपा सभा ; सदस्य म्हणाले तुकाराम मुंढेंना बोलवा; ढाकणे म्हणाले, मी सक्षम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:07 PM2018-10-13T12:07:27+5:302018-10-13T12:12:45+5:30
वाद शमला : प्रसूतिगृहातील विकासकामांवरून महापालिका सर्वसाधारण सभेत जुंपली
सोलापूर : डफरीन चौकातील अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृहातील विकासकामे नियम डावलून का करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला. शिवाय तुकाराम मुंढे यांच्याकडून या कामांची चौकशी करा, अशी मागणी राष्टÑवादीचे सदस्य किसन जाधव यांनी केली. त्यावर संतापलेल्या महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी, माझ्या अधिकारात मी पाच कोटी रुपयांचेही काम करु शकतो. कमिशनर म्हणून काम करायला मी सक्षम आहे, अशा शब्दांत सदस्यांना ठणकावले. आयुक्तांनी चांगले काम केले आहे. त्यामुळे विषय वाढवू नका, असे सांगत आनंद चंदनशिवेंसह इतर सदस्यांनी या वादावर पडदा टाकला.
महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. या सभेत नव्या विषयांबरोबरच मागील तहकूब सभांमधील विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहात करण्यात आलेल्या २५ लाख रुपयांच्या कार्याेत्तर खर्चास मान्यता देण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. काँग्रेसच्या नगरसेविका परवीन इनामदार यांनी ही कामे ६७ अ खाली करता येतात का? या कामांची निविदा का काढली नाही, असा प्रश्न केला.
शिवसेनेचे राजकुमार हंचाटे म्हणाले, नगरसेवकांना कामाचे तुकडे पाडण्यापासून रोखले जाते. मग इथे हा नियम का लावला नाही. भाजपच्या श्रीनिवास करली यांनीही हा मुद्दा लावून धरला. आरोग्य समितीला विश्वासात न घेता ही कामे करण्यात आली. समिती बरखास्त करुन टाका, असे हंचाटे म्हणाले. दुरुस्तीची कामे हा नियमित विषय आहे. कायद्याप्रमाणे मी, हे काम झालं आहे. यापेक्षा जास्त उत्तर देऊ शकत नाही, असे आयुक्त म्हणाले. पण समितीला हा विषय कळायला हवा होता. त्यांना काय चाललंय हे समजू तरी द्या, असे महेश कोठे यांनी सांगितले.
प्रशासनाचे खच्चीकरण करू नका
- राष्ट्रवादीच्या किसन जाधव यांनी २५ लाखांच्या कामात ई निविदा का राबविली नाही. आम्ही काल भेट दिल्यानंतर दवाखान्यातील काही कामे निकृष्ट असल्याचे आढळून आले आहे. आरोग्य अधिकाºयांच्या निवासस्थानावर ८ लाख रुपयांचा खर्च झाला. एवढी काय इमर्जन्सी होती. हे काम निविदा काढून करता आले असते. या कामांची तुकाराम मुुंढे यांना बोलावून चौकशी करा. यावर आयुक्तांनी विनाकारण प्रशासनाचे खच्चीकरण करु नका, असे सांगत ठणकावून उत्तर दिले. अखेर चंदनशिवे यांनी मध्यस्थी केली. शहरातील रुग्णालयांमध्ये चांगले काम झाले हे सदस्यांनी समजून घ्यावे. सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी या कामाचे कौतुक केले आहे. आयुक्तसाहेब तुम्ही मनाला लावून घेऊ नका. सभागृह नेते, महापौरांनी या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे जाहीर केले.
ट्री गार्ड देणार
- अन्यत्र बदली झालेले सहायक आयुक्त अभिजित हरळे यांचे १८ लाखांचे मेडिकल बिल सर्वसाधारण सभेला विश्वासात न घेता का दिले, असा प्रश्न आनंद चंदनशिवे यांनी विचारला. सुरेश पाटील यांना मदत देता येत नाही. मग इथे दुजाभाव का केला, असे चेतन नरोटे यांनी विचारले. अमृत योजनेतून शहरात वृक्ष लागवड करण्यात आली. वृक्षांच्या संरक्षणासाठी ट्री गार्ड द्यावे, अशी मागणी अमोल शिंदे यांनी केली. नगरसेवकांनीही ही मागणी लावून धरल्याने महापौर आणि आयुक्तांनी ही मागणी मान्य केली.