सोलापूर महापालिका आणि सिध्देश्वर देवस्थान कमिटीतील वाद यात्रेनंतरही कायम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 04:39 PM2019-02-04T16:39:49+5:302019-02-04T16:43:08+5:30
सोलापूर : सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीने होम मैदानाचा ताबा महापालिकेकडे दिल्याने मैदानावर यात्रेनिमित्त लागलेले बहुतांश स्टॉल गेल्या दोन दिवसांत हटविण्यात ...
सोलापूर : सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीने होम मैदानाचा ताबा महापालिकेकडे दिल्याने मैदानावर यात्रेनिमित्त लागलेले बहुतांश स्टॉल गेल्या दोन दिवसांत हटविण्यात आले आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत मैदान रिकामे होईल. यात्रा काळात मैदानाचे नुकसान झाल्याचा दावा निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीने केला आहे. त्यामुळे यात्रेपूर्वी सुरू झालेला महापालिका आणि देवस्थान कमिटीतील वाद यात्रेनंतरही कायम राहण्याची चिन्हे आहेत.
ग्रामदैवत सिध्देश्वरांच्या यात्रेनिमित्त दरवर्षी १५ डिसेंबर ते ३१ जानेवारी या काळासाठी होम मैदानाचा ताबा पंचकमिटीला देण्यात येतो. यात्रेनिमित्त मैदान आणि परिसरात लागलेले स्टॉल १० फेब्रुवारीपर्यंत कायम असतात. यावर्षी मैदानाच्या हस्तांतरावरुन पंचकमिटी आणि महापालिका प्रशासनात वाद झाले होते. होम मैदानाचे सुशोभीकरण करणाºया कंपनीने मैदानाचे नुकसान झाल्याचा अर्ज महापालिका आयुक्तांना दिला होता.
३१ जानेवारीला मुदत संपल्यामुळे होम मैदान तातडीने रिकामे करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पंचकमिटीला दिले होते. यादरम्यान, पंचकमिटीने मुदतवाढीसाठी अर्ज दिला होता. परंतु, आयुक्तांनी हा अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे पंचकमिटीने स्टॉलधारकांना तातडीने स्टॉल बंद करुन साहित्य उचलून नेण्याचे आदेश दिले. शनिवारी आणि रविवारी दिवसभर स्टॉल हटविण्याचे काम सुरू होते.
पंचकमिटीचे सदस्य बाळासाहेब भोगडे म्हणाले, होम मैदानावरील सर्व साहित्य सोमवारी सायंकाळपर्यंत काढण्यात येईल. सिध्देश्वर मंदिराकडील रस्ता ते विजापूर वेस या भागात लावलेल्या स्टॉलचे वीजकनेक्शन बंद करण्यात आले आहे. सोमवारी हे स्टॉल काढण्यात येतील. मैदानाचा ताबा महापालिकेकडे देण्यात आला आहे. यानंतर इतर गोष्टींवर आम्ही बोलणार आहोत.
नुकसानभरपाई वसूल करणार
- स्मार्ट सिटी योजनेतून होम मैदानाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. यात्रा काळात वॉकिंग ट्रॅकच्या बाजूला लावलेली झाडे, फरशा, बाकडे आणि साउंड यांचेही नुकसान झाल्याचा दावा निखिल कन्स्ट्रक्शनचे कर्मचारी, महापालिका अधिकाºयांनी केला आहे. सोमवारी पुन्हा पाहणी करुन त्याचा अहवाल आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना देण्यात येणार आहे. मैदानाची नुकसानभरपाई देवस्थान समितीकडून वसूल करण्यात येईल. शिवाय आराखड्याला डावलून रस्त्यावर स्टॉल टाकल्याप्रकरणी कारवाई होईल, असे आयुक्तांनी सांगितले आहे.