सोलापूर महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट ; भांडवली कामांचे टेंडर थांबविण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:09 PM2018-07-13T12:09:35+5:302018-07-13T12:10:34+5:30
शहरातील विकासकामे रखडणार, नगरसेवकांची नाराजी
सोलापूर : नगरसेवकांच्या भांडवली कामांचे टेंडर थांबविण्यात यावेत, असे आदेश आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी मुख्य लेखापाल विभागाला दिले आहेत.
महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. नगरसेवकांनी भांडवली निधीची अनेक कामे सुचविली आहेत. यात मंजूर झालेल्या कामांचे टेंडर काढण्यात आले, पण त्याला ठेकेदारांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे या कामांचे रिटेंडर करावे का, असा प्रस्ताव मुख्य लेखापाल कार्यालयाने आयुक्त डॉ. ढाकणे यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावावर आयुक्त डॉ. ढाकणे यांनी मुख्य लेखापाल धनवे, पवार यांची बैठक घेतली. भांडवली कामांसाठी महापालिकेच्या तिजोरीत पैसे उपलब्ध नसतील तर रिटेंडर करण्यासाठी यंत्रणा कामाला लावणयात काय अर्थ आहे. नवीन कामे व रिटेंडर प्रस्ताव महापालिकेच्या तिजोरीत पैसे येईपर्यंत स्थगित ठेवावेत, अशा सूचना आयुक्त डॉ. ढाकणे यांनी दिल्या.
सध्या मिळकतकराची बिले वाटण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे करभरणा अद्याप म्हणावा तसा होत नाही. बांधकाम परवाना व इतर विभागाकडून आलेल्या पैशातून महापालिकेचा इतर खर्च भागविला जात आहे. याशिवाय ठेकेदारांची जुनी देणी द्यायची आहेत. अशा परिस्थितीत भांडवली कामांसाठी्र कोठून पैसा आणणार, असा प्रश्न आहे. महापालिकेच्या तिजोरीत विकासकामांसाठी जोपर्यंत पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत कामाचे टेंडर आता बंद राहणार आहेत. यामुळे भांडवली कामे सुचविलेल्या नगरसेवकांना महापालिकेच्या उत्पन्नाची वाट पाहावी लागणार आहे. आता ही स्थिती किती दिवस राहणार हे सांगणे कठीण होऊन बसले आहे.
ही कामे थांबणार
नगरसेवकांनी सन २0१७-१८ मधील भांडवली कामांची यादी मंजुरीसाठी दिली होती. यातील बºयाच सदस्यांची कामे प्रशासनाने मंजूर केली होती. या कामांत रस्ते, ड्रेनेज, दिवाबत्ती, पाणी पुरवठ्याच्या कामाचा समावेश आहे. या कामांचे टेंडर निघाले आहेत. पूर्वीचीच बिले थकीत असल्याने टेंडर घेण्यासाठी ठेकेदार पुढे आलेच नाहीत. त्यामुळे टेंडर काढण्यासाठी यंत्रणा कामाला लावून वेळ वाया घालविण्यापेक्षा कामेच थांबवा, अशा सूचना आयुक्तांनी लेखा विभागाला दिल्या आहेत.