एमआयएमचे ओवेसी यांना मानपत्र देण्याचा प्रस्ताव सोलापूर महापालिकेने फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 02:36 PM2018-04-20T14:36:33+5:302018-04-20T14:36:33+5:30
एमआयएमचे संस्थापक अध्यक्ष खा़ असोउद्दीन ओवेसी यांना मानपत्र देण्याचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिका सभेने बहुमताने फेटाळला़
सोलापूर : एमआयएमचे संस्थापक अध्यक्ष खा़ असोउद्दीन ओवेसी यांना मानपत्र देण्याचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिका सभेने बहुमताने फेटाळला़ शुक्रवारी सकाळी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली़ या सभेत एमआयएमचे सदस्य तौफिक शेख, गाजी जहागीरदार, रियाज खैरादी यांनी दिलेला प्रस्ताव चर्चेला आला़ ओवेसी यांना मानपत्र द्यावे अशी मागणी केली़ सभागृहनेते संजय कोळी यांनी ओवेसी यांनी महाराष्ट्र किंवा सोलापूरसाठी कोणतेही ठळक काम केलेले नाही, त्यामुळे त्यांना मानपत्र देता येणार नाही अशी सुचना मांडली़ शिवसेनेचे नगरसेवक गुरूशांत धुत्तरगांवकर यांनी या पक्षाचा इतिहास देशाच्या हिताविरोधी आहे़ त्या पक्षाच्या प्रमुखाला मानपत्र देण्यास शिवसेनेचा कठोर विरोध आहे, ओवेसी हे उच्चशिक्षित व बुध्दीमान आहेत़ त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे पण एमआयएमच्या स्थापनेचा इतिहास पाहता मानपत्र देण्यास आमचा ठामपणे विरोध राहील असे नमुद केले़ चर्चेवेळी तौफिक शेख यांनी हा राजकारणाचा विषय नाही, एका पक्षप्रमुखांच्या कार्याची नोंद घेण्याचा आहे त्यामुळे मानपत्र देण्याबाबत विचार व्हावा अशी विनंती केली़ खैरादी यांनी रामदेवबाबा यांनी सोलापूरकरांसाठी काय केले ते उद्योजक आहेत सभेत ठराव झालेले नसताना बेकायदेशीर त्यांना मानपत्र देण्यात आले मग ओवेसी यांच्याबाबतीत दुजाभाव का असा सवाल केला़ चर्चेअंती बहुमताने ओवेसी यांना मानपत्र देण्याचा ठराव फेटाळण्यात आला़