सोलापूर महानगरपालिका; ‘परिवहन’ भाजपकडे, सहा महिन्यांनी शिवसेनेला उपमहापौरपद मिळणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 12:58 PM2019-03-07T12:58:46+5:302019-03-07T13:00:42+5:30
सोलापूर : लोकसभा-विधानसभेनंतर आता महापालिकेतही भाजपा आणि शिवसेना युती करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मनपाची परिवहन समिती यंदा भाजपाकडेच राहणार ...
सोलापूर : लोकसभा-विधानसभेनंतर आता महापालिकेतही भाजपा आणि शिवसेना युती करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मनपाची परिवहन समिती यंदा भाजपाकडेच राहणार आहे. सहा महिन्यांनी होणाºया महापौर-उपमहापौर निवडीवेळी उपमहापौरपद शिवसेनेला देण्याचे आश्वासन भाजपा नेत्यांनी दिले. यानंतर पुढील वर्षी एक वर्षासाठी स्थायी समिती आणि परिवहन समितीत सेनेला समान वाटा मिळणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेनेची युती जाहीर झाल्यानंतर महापालिकेतही युती करण्याचा निर्णय दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी घेतला. दोन दिवसांपूर्वी भाजपाचे शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, सभागृह नेते संजय कोळी, शिवसेनेचे नगरसेवक राजकुमार हंचाटे यांच्यात प्राथमिक बैठक झाली. शिवसेनेला स्थायी समिती आणि उपमहापौरपद देण्यात यावे, अशी हंचाटे यांनी मागणी केली. या चर्चेचा वृत्तांत दोन्ही देशमुखांच्या कानावर घालून निर्णय कळवू, असे या बैठकीत सांगण्यात आले होते.
पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या राजवाडे चौकातील कार्यालयात बुधवारी पुन्हा बैठक झाली. या बैठकीला सभागृह नेते संजय कोळी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, राजकुमार हंचाटे उपस्थित होते. यंदा परिवहन समिती भाजपाकडे राहावी. सहा महिन्यांनी पुन्हा पदाधिकारी निवडी होतील. त्यावेळी सेनेला उपमहापौरपद देऊ. सोबत महिला बालकल्याण समिती आणि शिक्षण समिती देऊ, असे आश्वासन पालकमंत्री देशमुख यांनी दिले. या समितीचा कालावधी संपल्यानंतर एक वर्षासाठी स्थायी आणि परिवहन समिती सेनेला देण्याचे आश्वासन देण्यात आले. या वाटाघाटींचा वृत्तांत प्रदेश कार्यकारिणीला पाठविण्यात येणार आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि शिवसेनेचे संपर्कमंत्री रामदास कदम यांच्यातही चर्चा झाली आहे.
नेत्यांना अमावस्येची भीती, मनोमिलन मेळावा घेणार !
- पालकमंत्र्यांच्या कार्यालयात युतीवर शिक्कामोर्तब झाले. पण बुधवारी अमावस्या असल्याने गुरुवारी निर्णय जाहीर करण्याचा निर्णय भाजपा व सेनेच्या नेत्यांनी घेतला. दोन्ही पक्षाच्या नगरसेवक, कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश जावा यासाठी परिवहन समिती सभापतीची निवड झाल्यानंतर मनोमिलन कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
आमच्या प्रतिनिधींनी बुधवारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी चर्चा केली आहे. एकत्र काम करायचे ठरले आहे. तीन वर्षात एक-एक कॅबिनेट समिती शिवसेनेला मिळावी, अशी आमची मागणी आहे. परिवहन समितीबाबत अद्याप निर्णय झाला नाही. कारण विरोधकांनी पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे. चमत्कारही घडू शकतो. गुरुवारी पुन्हा बैठक होईल. - महेश कोठे, जिल्हाप्रमुख, शिवसेना