सोलापूर महानगरपालिकेतील स्थापत्यच्या आकडेवारीत घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 02:23 PM2018-06-08T14:23:27+5:302018-06-08T14:23:27+5:30
नगरसचिवांना निलंबित करण्याची स्थापत्य समितीची आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याकडे शिफारस
सोलापूर : स्थापत्य समितीच्या बैठकीसाठी काढण्यात आलेल्या अजेंड्यामध्ये झालेल्या गंभीर चुकांना जबाबदार धरून नगरसचिव यांना निलंबित करण्याची शिफारस आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे करण्यात आली आहे. स्थापत्य समितीच्या गतवर्षीच्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकारामुळे अधिकारी वर्गात खळबळ उडाली आहे.
महानगरपालिकेच्या स्थापत्य समितीची बैठक गुरुवारी सभापती गुरुशांत धुत्तरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत अजेंड्यावर एकूण ४२ पूर्वगणनपत्रक विषय मंजुरीसाठी आले होते. बैठकीत आणखी १३ विषय तातडीने दाखल करण्यात आले. एकूण ५५ विषयांवर चर्चा होऊन एकमताने मंजुरी देण्यात आली.
या बैठकीच्या अजेंड्यावर आलेल्या विषयांमध्ये मोठ्या आणि गंभीर चुका आढळून आल्या. अनेक विषयांमध्ये टायपिंगच्या चुका निघाल्या. विषय क्रमांक ४0 आणि ४१ यामध्ये ६0 ते ६५ फायलींचे रेकॉर्ड जतन करण्यासाठी ४0 लाखांचे पूर्वगणनपत्रक स्थापत्य समितीसमोर आले होते. वास्तविक पाहता नगर अभियंता कार्यालयाकडे ६0 ते ६५ हजार फायली आहेत. असे असताना अजेंड्यावर केवळ ६0 ते ६५ फायली असा उल्लेख करण्यात आला.
विषय क्रमांक ४0 यामध्ये एस्टिमेट २४ लाख ५७ हजार असे असताना अजेंड्यावर १४ लाख ४0 हजार ३१२ दाखविण्यात आला आहे. यामध्ये १0 लाखांची तफावत करण्यात आली. तसेच विषय क्रमांक ४१ यामध्ये एस्टिमेट १७ लाख ४० हजार ३१२ रुपये असे असताना अजेंड्यावर मात्र ही रक्कम २४ लाख ५७ हजार अशी दाखविण्यात आली आहे. याचबरोबर अजेंड्यावरील विषय क्रमांक ६६ आणि ६७ यामध्ये चुकीचे छापण्यात आले आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजनेतून हे विषय होणार असून अजेंड्यावर मात्र भांडवली निधीतून असा उल्लेख करण्यात आला आहे.
महापालिकेच्या कामात अशा प्रकारची हलगर्जी योग्य नाही. प्रशासनावर अंकुश रहावा म्हणून स्थापत्य समितीने हा निर्णय घेतला आहे. भविष्यात अशा चुका होऊ नये व नगरसचिव कार्यालयाने आपले काम अचूक करावे यासाठी आपण स्थापत्य समितीच्या वतीने संबंधित नगरसचिवाला निलंबित करण्याची शिफारस केली आहे.
-गुरुशांत धुत्तरगावकर,
सभापती, स्थापत्य समिती.