सोलापूर महापालिकेला बोगस बिल सादर करणाºया मक्तेदाराविरुद्ध अखेर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 09:19 AM2020-01-23T09:19:09+5:302020-01-23T09:21:02+5:30
‘लोकमत’चा दणका; बिंग फुटलेच, ‘दयावान’ नगरसेवकाची कोंडी
सोलापूर : महापालिका अधिकाºयांच्या बनावट सह्या करून एक लाख ९७ हजार रुपये हडप करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मक्तेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा मक्तेदार प्रभाग क्र. ४ मधील भाजपच्या ‘दयावान’ नगरसेवकाचा निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे.
सतीश सुभाष इरकल (प्रमुख - सायली एंटरप्रायझेस, बुधवार पेठ, वडार गल्ली, सोलापूर) असे संशयित मक्तेदाराचे नाव आहे. याप्रकरणी महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, महापालिकेने मराठा वस्ती भागात ड्रेनेजलाईनचे काम करण्यासाठी ७ मार्च २०१९ रोजी निविदा काढली होती. हे काम जय मातादी कन्स्ट्रक्शनला मिळाले. काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी या कामाचे एक लाख ५० हजार १६४ रुपयांचे बिल मनपाकडे सादर केले. त्यानंतर सतीश इरकल यांच्या सायली एंटरप्रायझेस कंपनीने हेच काम केल्याचे दाखवून सप्टेंबर महिन्यात एक लाख ९७ हजार ८३८ रुपयांचे बिल सादर केले.
काम न करताच बिल सादर करण्याचे धाडस करणाºया मक्तेदाराने या बिलावर विभागीय अधिकारी मोहन कांबळे, आवेक्षक अविनाश कामत आणि सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांच्या सह्या करून देयके सादर केली. ही बिले संजय धनशेट्टी यांच्याकडे आल्यानंतर त्यांना आपली सही बनावट असल्याचे लक्षात आले. यादरम्यान महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक शिरीष धनवे यांनाही या बिलांवर मनपा अधिकाºयांच्या बनावट सह्या झाल्याचे लक्षात आले.
काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, वंचित बहुजन आघाडीचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी हा विषय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. महापौर यन्नम यांनी आदेश दिले तरी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. एका नगरसेवकाचे प्रकरण बाहेर निघाले तर इतर अनेक नगरसेवकांची भानगड बाहेर पडेल, अशी चर्चा काही नगरसेवकांनी केली. ‘लोकमत’ ने यासंदर्भात पाठपुरावा केला. यानंतर आयुक्त तावरे यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
मनपा अधिकाºयांचा पोलीस ठाण्यात ठिय्या
- महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी, विभागीय अधिकारी मोहन कांबळे, आवेक्षक अविनाश कामत बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमाराला सदर बझार पोलीस ठाण्यात आले. पोलिसांनी जबाब घेऊन सतीश इरकल याच्यावर गुन्हा दाखल केला.
प्रभाग क्र. ४ मधील कामांच्या चौकशीसाठी तीन जणांची समिती
- महापालिकेच्या प्रभाग क्र. ४ मधील बोगस कामांच्या चौकशीसाठी तीन जणांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. याबाबत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी मागणी केली होती. या समितीमध्ये तांत्रिक लेखापरीक्षक रशीद मुंढेवाडी, गवसू विभागातील राजेंद्र लिंबितोटे, रस्ते विभागातील दीपक रजपूत यांचा समावेश आहे.