सोलापूर महानगरपालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढीसाठी शिष्यवृत्तीची फी मनपा भरणार, माध्यमिक शाळांचा घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 04:12 PM2018-01-30T16:12:32+5:302018-01-30T16:13:39+5:30
मनपा शाळांची गुणवत्ता वाढीसाठी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेची फी मनपा भरणार असल्याची माहिती उपआयुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी दिली.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ३० : मनपा शाळांची गुणवत्ता वाढीसाठी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेची फी मनपा भरणार असल्याची माहिती उपआयुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी दिली.
गतवर्षीपासून शिष्यवृत्ती परीक्षा पद्धतीत बदल झाला आहे. पूर्वी चौथी व सातवीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात होती, पण गतवर्षीपासून पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जात आहे. मनपा शिक्षण मंडळातर्फे प्राथमिक शाळांचा कारभार पाहिला जातो. प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ पूर्वीपासूनच दिला जात आहे. गतवर्षी ९ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. चालूवर्षी ७० विद्यार्थ्यांनी आॅनलाईन फॉर्म भरला आहे. या विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी सराव परीक्षा घेतल्या जात आहेत.
प्राथमिक शिक्षण मंडळाकडे पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग येतात. आठवी ते दहावीपर्यंतचे वर्ग प्रशासनाकडून पाहिले जातात. मनपाच्या माध्यमिक सहा शाळा आहेत. यापूर्वी या शाळांमधून शिष्यवृत्ती परीक्षेला विद्यार्थी बसविले जात नव्हते. यंदापासून हा प्रयोग राबविण्यासाठी माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक व पर्यवेक्षकांची बैठक घेतली. विद्यार्थ्यांचे शुल्क मनपा भरेल. त्यादृष्टीने या परीक्षेला पात्र ठरणाºया आठवीच्या मुलांचा आॅनलाईन अर्ज शिक्षकांनी भरावा, असे सूचित केले आहे. माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची वानवा आहे. भरती बंद असल्याने पर्यायी शिक्षक नियुक्त करून कामकाज पाहिले जात आहे. अशाही स्थितीत शाळांची गुणवत्ता वाढीसाठी इच्छुकांचे आॅनलाईन अर्ज भरावेत, अशा सूचना केल्याचे ढेंगळे-पाटील यांनी सांगितले.