दीड कोटी रुपये खर्च करून सोलापूर महापालिका उभारणार दोन ऑक्सीजन प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 07:52 AM2021-04-24T07:52:45+5:302021-04-24T07:53:17+5:30
आपत्कालीन परिस्थिती म्हणून तातडीने वर्क ऑर्डर देणार
सोलापूर - महापालिकेने बॉईज आणि राज्य विमा कामगार हॉस्पिटल मध्ये १ कोटी ४४ लाख खर्चून दोन ऑक्सीजन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आपत्कालीन परिस्थितीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू तातडीने या कामाची वर्कऑर्डर देण्यात येणार असल्याचे महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी लोकमतला सांगितले.
शहरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सीजनचा मोठा तुटवडा आहे. पालिकेने कोरूना बाधित रुग्णांसाठी बॉईज आणि राज्य विमा कामगार हॉस्पिटलमध्ये एकूण १७० बेडची सुविधा उपलब्ध केली आहे. या दोन्ही रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी ऑक्सिजनची आणीबाणी होती. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दोन्ही रूग्णालयात ऑक्सीजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला.
राज्य सरकारने यासंदर्भात काही निर्देश आणि खर्चाचे धोरण निश्चित केले आहे. यापेक्षा कमी खर्चाने महापालिका आपला प्रकल्प उभारणार असल्याचे पांडे म्हणाले. हे काम ४० ते ४५ दिवसात पूर्ण होणार आहे.