सोलापूर महापालिकेच्या दिव्यांग कल्याण विभागाचा कारभार ढिम्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 03:34 PM2019-06-20T15:34:21+5:302019-06-20T15:36:52+5:30
बच्चू कडूंच्या इशाºयानंतरही महापालिकेच्या निष्क्रिय अधिकाºयांमुळे दिव्यांग बांधव वंचित
सोलापूर : आमदार बच्चू कडू यांच्या इशाºयानंतर महापालिकेच्या दिव्यांग कल्याण विभागाने १४ कलमी कार्यक्रम राबविण्यास गती दिलेली नाही. निष्क्रिय अधिकाºयांमुळे शहरातील दिव्यांग बांधव शासकीय योजनांपासून वंचित राहत असल्याची टीका कामगार व समाजकल्याण समितीचे सभापती आणि नगरसेवकांनी केली आहे.
महापालिकेने विकलांग सहाय योजने अंतर्गत १४ कलमी कार्यक्रम निश्चित केला होता. त्यासाठी ९ कोटी रुपयांची तरतूद केली होती. वर्ष उलटून गेले तरी यापैकी केवळ ८९ लाख ५० हजार रुपयांचा खर्च झाला आहे. प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी १३ मे रोजी महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेतली.
या बैठकीत त्यांनी दिव्यांग विभागाच्या कामावर नाराजी व्यक्त केली. त्यावर अधिकाºयांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. सहा महिन्यांनी पुन्हा येईन. तोपर्यंत काम न झाल्यास मनपा आयुक्तांच्या कानपटात लगावेन, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता. त्यावरुन बराच गदारोळ झाला. यानंतरही दिव्यांग कल्याण विभागातील कामात सुधारणा झालेली नाही.
कामगार व समाजकल्याण सभापती राजकुमार हंचाटे म्हणाले, दिव्यांग कल्याण विभागात निष्क्रिय अधिकारी बसविले आहेत. दोन दिवसांपूर्वी या विभागाची बैठक घेतली.
१४ कलमी कार्यक्रमापैकी केवळ दोन योजनांवर काम झाले. उर्वरित योजना का राबविल्या नाहीत. शहरातील दिव्यांग बांधवांपर्यंत तुम्ही का पोहोचला नाहीत, असे अनेक प्रश्न कामगार कल्याण अधिकारी विजयकुमार कांबळे यांना विचारले. त्यावर वैतागलेल्या कांबळे यांनी थेट राजीनामा देण्याची तयारी दाखविली. अधिकाºयांना दिव्यांग बांधवांबद्दल सहानुभूती नाही. या विभागाकडे शहरातील दिव्यांग बांधवांची व्यवस्थित नोंद नाही. नव्याने नोंद करावी, असे यांना वाटत नाही.
कार्यालयाची जागा अडचणीची
- महापालिकेचे दिव्यांग कल्याण कार्यालय इंद्रभुवन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आहे. अडथळ्यांची शर्यत पार करीत तिथे जावे लागते. धडधाकट माणसांना तिथे व्यवस्थित पोहोचता येत नाही. मग दिव्यांग बांधव तिथे कसे पोहोचणार?, असा सवाल राजकुमार हंचाटे आणि प्रहार संघटनेचे जमीर शेख यांनी उपस्थित केला. कौन्सिल हॉलच्या तळमजल्यावर जनगणना विभागाचे कार्यालय आहे. हे कार्यालय इंद्रभुवनमध्ये हलवून कामगार कल्याण कार्यालय कौन्सिल हॉलच्या तळमजल्यावर आणावे, अशी मागणी मनपा आयुक्तांकडे करणार असल्याचे हंचाटे आणि शेख यांनी सांगितले.
हे ठरविले, पण अंमलबजावणी नाही
- दिव्यांग बांधवांच्या बचत गटांसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये अनुदान
- दिव्यांग बांधवांसाठी विविध स्पर्धा आयोजित करणे
- व्यवसायासाठी प्रत्येकी ५० हजार रुपये अनुदान
- मतिमंद विद्यार्थ्यांच्या संस्थेला प्रत्येकी ५० हजार रुपये अनुदान
- दिव्यांगासाठी स्वतंत्र व्यायामशाळा बांधणे
- शहरातील पाच उद्यानांमध्ये दिव्यांगासाठी खेळणी बसविणे
दिव्यांग सहाय योजनेत आखलेला १४ कलमी कार्यक्रम विविध विभागांमार्फत राबविण्यात येत आहे. खेळणी बसविणे, व्यायामशाळा बांधणे यासारखी कामे नगरअभियंता कार्यालयाने केली नाहीत. त्यांना पत्र पाठवूनही उपयोग नाही. स्पर्धा आयोजित करण्याचे काम क्रीडा व शिक्षण विभागाने केलेले नाही. अनुदानाचे प्रस्ताव आमच्याकडे आले आहेत. त्यावर निर्णय होईल. इतर विभाग काम करीत नाही. त्याचा दोष आमच्यावर येतो.
-विजयकुमार कांबळे, कामगार कल्याण अधिकारी, मनपा.