निविदा मॅनेज प्रकरणावरून सोलापूर महापालिकेची सभागृह तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 07:11 PM2020-03-09T19:11:53+5:302020-03-09T19:15:05+5:30
सभागृहात गोंधळ वाढल्याने महापौर श्रीकांचना यन्नम यांनी केली सभा तहकूब
सोलापूर : महापालिकेत निविदा मॅनेज केल्या जात आहेत. याची चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेस, शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली. गोंधळ वाढल्याने महापौर श्रीकांचना यन्नम यांनी सभा तहकूब केली.
महापालिकेच्या सभेच्या अजेंड्यावर विविध कामांच्या वर्क ऑर्डरचे प्रस्ताव होते. यातील सहा कामे एकाच मक्तेदाराला दिली आहेत. निविदा मॅनेज केल्या आहेत, असा आरोप करण्यात आला. पण सर्वकाही नियमाप्रमाणे झाले आहे असे सभागृह नेते श्रीनिवास करली आणि अधिकाऱ्यांनी सांगितले.
लोकशाही नाकारून तुम्ही मनाप्रमाणे कारभार करत असाल तर आम्ही सभागृहात थांबणार नाही, असे काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे म्हणाले. त्यांच्या मागे शिवसेना आणि काँग्रेस नगरसेवक बाहेर पडले. वंचित बहुजन आघाडीचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी शिवसेना आणि काँग्रेसवर टीका केली. मागास वस्तीतील विकासकामांबद्दल यांना देणेघेणे नाही, असेही त्यांनी सांगितले.