सोलापूरची महापालिका लय भारी; साेलापूर ठरले देशात १७ वे राहण्यायाेग्य शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 01:41 PM2021-03-05T13:41:11+5:302021-03-05T13:43:17+5:30
स्मार्ट सिटी सर्वेक्षण : सोलापूरकर म्हणतात सोलापूरची महापालिका लय भारी
साेलापूर - केंद्र सरकारच्या शहरी आवास व कार्यासन मंत्रालयाने राहण्यासाठी उत्तम शहर (एज ऑफ लिव्हींग इंडेक्स) अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणात साेलापूर हे देशातील १७ वे आणि राज्यातील चाैथे राहण्यायाेग्य शहर ठरले आहे. कृत्रिम पाणी टंचाई, धुळीबद्दल लाेक तक्रार करीत असले तरी साेलापूरची महापालिका ही लयभारी असल्याचा निष्कर्ष नागरिकांनी काढल्याचा दावा या सर्वेक्षणाच्या निकालातून आला आहे.
केंद्र सरकारने २०१९-२० या वर्षात स्मार्ट सिटींसाठी हे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात देशातील ११४ शहरांनी सहभाग नाेंदविला. साेलापूचा २०१६ मध्ये स्मार्ट सिटी याेजनेमध्ये समावेश झाला हाेता. स्मार्ट सिटी कंपनीकडून यात सहभाग नाेंदविण्यात आला. या सर्वेक्षणात शहरातील व्यवसाय, शैक्षणिक व्यवस्था, आराेग्य व्यवस्था, परवडणारी घरे, स्वच्छता, पिण्याचे पाणी, दळणवळणाची साधने, मैदाने, महिला सुरक्षा, व्यवसायाच्या संधी, बॅंकिंग सेवा अशा विविध माहितीचे सादरीकरण करण्यात आले. १ ते २९ फेब्रुवारी या कालावधीत लाेकांकडून एका ॲपवर मतेही मागवण्यात आली. याचा अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात आला. या सर्वेक्षणाचा निकाल जाहीर झाला असून साेलापूर स्मार्ट सिटीला देशात १७ वे आणि राज्यात चाैथे मानांकन प्राप्त झाले आहे.
असा आहे निष्कर्ष
या सर्वेक्षणात नागरिकांनी साेलापुरात शिक्षण, आराेग्य, सार्वजनिक स्वच्छता, पाण्याची गुणवत्ता, हवा, परवडणारी वीज अशा अनेक सुविधा उत्तम असल्याचे म्हटले आहे. परवडणाऱ्या गाेष्टींमध्ये साेलापूर देशात प्रथम ठरले आहे. पाणी पुरवठ्याबद्दल मात्र लाेक नाराज आहेत.
स्मार्ट सिटी याेजनेतून घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, ड्रेनेज लाइनची कामे सुरू आहेत. हाेम मैदानाचे सुशाेभीकरण करुन वाॅकिंग ट्रॅक तयार केला आहे. पार्क स्टेडियमचे सुशाेभीकरण प्रगतीपथावर आहे. पथदिव्यांवर एलईडी लाइट बसविण्यात आले आहेत. अशाा विविध कामांमुळे साेलापूरचे रुप बदलत आहेत. त्यामुळे साेलापूरला मानांकन मिळाले आहे. या कामांमध्ये महापाैर श्रीकांचना यन्नम, आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासह सर्व नगरसेवक, अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाले आहे.
- त्रिंबक ढेंगळे-पाटील, कार्यकारी संचालक, स्मार्ट सिटी.