सोलापूर महापालिकेचे दुर्लक्ष ; विनापरवाना खोदले जाताहेत रस्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 12:45 PM2018-07-19T12:45:38+5:302018-07-19T12:47:53+5:30
अधिकारी बेफिकीर: खड्डे बुजविण्यासाठी मोठा खर्च
सोलापूर : शहरात नव्याने झालेले खड्डे विनापरवाना खोदण्याचे प्रकार वाढले आहेत. नगरअभियंता कार्यालयास कोणतीही कल्पना न देता शहरात सुटीच्या दिवशी खोदकाम उरकले जात असून, याकडे संबंधित अधिकाºयांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या प्रभागात रेल्वे लाईन्समध्ये नगरोत्थानमधून नव्याने करण्यात आलेला रस्ता केबल टाकण्यासाठी खोदण्यात आला. नवीन रस्ता खोदण्यात येत असल्यामुळे नगरसेविका फुलारे यांना शंका आली. त्यांनी नगरअभियंता कार्यालयात या रस्त्याच्या खोदाईची परवानगी घेण्यात आली आहे काय याची खातरजमा केली. त्यावेळी विनापरवाना या रस्त्याची खोदाई करण्यात येत असल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे तक्रार केली. त्यावर आयुक्तांनी चौकशी करून रिलायन्सला दंड केला.
शहरात अशा प्रकारे अनेक ठिकाणी नवीन रस्ते खोदले जात आहेत. पण कोणीच लक्ष देत नसल्याने महापालिकेचे मोठे नुकसान तर सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
जुळे सोलापुरात सैफुल ते बॉम्बे पार्क असा नवीन रस्ता तयार करण्यात आला. ड्रेनेज जोडकामासाठी रस्ता जागोजागी खोदण्यात आला. त्याचबरोबर सैफुल ते आयएमएस स्कूल रस्ता जागोजागी खोदण्यात आला आहे. याशिवाय विजापूर महामार्गाच्या डाव्या बाजूने ड्रेनेजलाईनसाठी खोदाई करण्यात आली. पण खड्डे अर्धवट बुजविण्यात आले. पावसामुळे हे खड्डे मोठे होऊन अपघातास कारणीभूत बनले आहेत. ड्रेनेज जोडणीसाठी सुटीदिवशी व रात्री-अपरात्री रस्ते खोदले जात आहेत. याकडे महापालिकेच्या झोन किंवा संबंधित विभागाचे अधिकारी लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे.
गणेश सोसायटीत रस्ता खोदला
- जुळे सोलापुरातील गणेश सोसायटी, रजनी पार्क, लक्ष्मी सोसायटी, ज्ञानेश्वरनगरकडे जाणारा रस्ता नगरोत्थान योजनेतून नव्याने करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या पावसात सोसायटीचे पाणी साचले. त्यामुळे ड्रेनेजलाईन तुंबल्याने नवा रस्ता खोदून पाईप घालून पाण्याला मार्ग काढण्यात आला. रस्ता करताना याबाबत काळजी घेतली नाही. तसेच रस्ता खोदताना नगरअभियंता कार्यालयाची परवानगी घेतली नसल्याचे दिसून आले आहे. आता नव्याने नगरोत्थान योजनेतून रस्ते करण्यात येत आहेत. किमान या रस्त्यासाठी तरी कडक नियमावली करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
नगरोत्थानमधून केलेले डीपी रस्ते तीन वर्षे खोदायचे नाहीत असा दंडक आहे. अत्यावश्यक पाणीपुरवठा व ड्रेनेजलाईनसाठी क्वचित रस्ते खोदावे लागतात. पण आता आयुक्तांनी या दोन्ही बाबी झाल्याशिवाय रस्ते करण्यास परवानगी देऊ नयेत असे आदेश दिले आहेत.जुळे सोलापुरातील रस्ता खोदताना परवानगी घेतलेली नाही.
-संदीप कारंजे
प्रभारी नगरअभियंता