वृद्ध दांपत्याला मारहाण करून दागिने लुटले, पळताना एकाला पकडून पोलिसांच्या हवाली केले
By काशिनाथ वाघमारे | Published: April 24, 2023 07:17 PM2023-04-24T19:17:20+5:302023-04-24T19:18:19+5:30
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गोपाळ पवार हे करीत आहेत.
सोलापूर : झोपलेल्या वृद्ध महिलेच्या घरात घुसून पाच चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत काठीने जबर मारहाण केली. गळ्यातील दागिने व कर्णफुले घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. मात्र या घटनेदरम्यान वस्तीवरील लोक जागे झाले आणि त्यांच्यापैकी एका चोरट्याला जमलेल्या लोकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले.
रविवार, २३ एप्रिल रोजी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास लऊळ (ता.माढा) येथील मांदेवस्ती येथे ही घटना घडली.याबाबत शशीकला शंकर मांदे (वय ६०) यांनी कुर्डूवाडी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. दादा कांगऱ्या शिंदे (वय ५५,रा.उजनी मा,ता.माढा) असे नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलेल्या चाेरट्याचे नाव आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार शशीकला मांदे आणि त्यांचे पती शंकर मांदे रविवारी रात्री घरात झोपले होते. रात्री ११: ३० ते ११: ४० वाजण्याच्या सुमारास पाच चोरटे घरात शिरले. दोघांनी चाकूचा धाक दाखवत मारहाण करण्यास सुरूवात केली. वृध्द महिलेच्या अंगावर बसून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व कर्णफुलेसह ७८ हजार ५०० रूपयांचा ऐवज काढून घेतला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक गोपाळ पवार हे करीत आहेत.
पिता-पूत्र आले धाऊन
वीज आली आणि शेतात लाईट आली म्हणून दारं धरायला गेलेले पिता-पुत्र वृद्ध दांपत्याचा आरडाओरडा ऐकून वस्तीवर धावून आले. कोणीतरी येत असल्याचा सुगावा लागताच चोरट्यांनी धूम ठोकली. त्यांच्यापैकी चौघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले, मात्र एकजण समोर असणा-या मेकेला धडकून खाली पडला. लागलीच त्या दोघांनी त्याला पकडले आणि त्याला बांधून ठेवले.
ग्रामसुरक्षा दल सतर्क
त्यानंतर त्या पिता-पुत्राने पोलीस पाटील चंद्रकांत लोकरे यांना फोनद्वारे माहिती दिली. लोकरे यांनी ही घटना कुर्डूवाडी पोलिसांना कळवून ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे लोकांनाही सतर्क केले. अवघ्या काही वेळातच गस्तीवर असणारे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पकडलेल्या चोराला पोलिसांच्या स्वाधीन केले.