रात्रीचे सोलापूर ; अण्णा, बरं झालं नायतर मयत गळ्यात पडत हुतं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 03:42 PM2018-12-18T15:42:17+5:302018-12-18T15:44:16+5:30

शनिवारी रात्री गारठ्यामध्ये अचानक वाढ झालेली. त्यामुळे रस्त्यावरून दुचाकी वाहनांवरून घराकडे जाणाºयांची लगबग. स्टेशन चौकातील महात्मा गांधींचा पुतळा हॅलोजनच्या ...

Solapur of the night; Anna, that is why I fall in love with ... | रात्रीचे सोलापूर ; अण्णा, बरं झालं नायतर मयत गळ्यात पडत हुतं...

रात्रीचे सोलापूर ; अण्णा, बरं झालं नायतर मयत गळ्यात पडत हुतं...

googlenewsNext
ठळक मुद्देस्टेशन चौकाच्या आऊटगेटला थांबणाºया रिक्षांचे क्रमांक फलकावर नोंदस्टेशन चौकीत एक पोलीस नाईक  मोठ्या एकाग्रतेने डायरी तपासत होतेस्टेशन चौक़... रात्रीचे ९.३0 वाजलेले. चौकात रिक्षांची फुल्ल गर्दी.

शनिवारी रात्री गारठ्यामध्ये अचानक वाढ झालेली. त्यामुळे रस्त्यावरून दुचाकी वाहनांवरून घराकडे जाणाºयांची लगबग. स्टेशन चौकातील महात्मा गांधींचा पुतळा हॅलोजनच्या प्रकाशात न्हाऊन निघालेला. चौकाचे वर्तुळ मात्र रिक्षांनी व्यापून गेलेले. अशात स्टेशनकडून येणाºया वाºयाच्या झुळुकीत हातगाड्यांवरील भज्यांचा उग्र वास मिसळलेला. मध्येच सात रस्ता चौकाकडून येणाºया अवजड वाहनांचा गोंगाट चौकातील शांतता भंग करताना दिसत होता. चौकाची वळणावरील रिक्षांची गर्दी कापत ही अवजड वाहने भैय्या चौकाकडे मार्गस्थ होताना दिसत होती. कोपºयावर कौलारू इमारतीत असलेल्या स्टेशन पोलीस चौकीत मात्र शांतता दिसत होती. ही शांतता कायम ठेवण्यासाठी चौकीतील पोलीस आजूबाजूला फिरताना दिसत होते. अशात एक गोंगाट लक्ष वेधून घेत होता. सायेब चला स्टॅन्ड, कुठे सात रस्त्याला जाणार का...भाडे मिळविण्यासाठी रिक्षाचालकांची ही होती लगबग.

ए भाऊ, आम्ही... 
स्टेशन चौक़... रात्रीचे ९.३0 वाजलेले. चौकात रिक्षांची फुल्ल गर्दी. स्टेशन पोलीस चौकशीशेजारील रेल्वे स्टेशनचा बाहेर पडण्याचा मार्ग, आतून अनेक प्रवासी बाहेर पडताना दिसत होते. त्यामुळे प्रवाशांचे भाडे मिळेल या आशेने रिक्षाचालकांची गर्दी. ओ स्टॅन्ड, सैफुल, विडी घरकुल असा आवाज सुरू असलेला.  अशात रस्त्यावरून आलेल्या एका रिक्षाने अचानक थांबून प्रवाशाला आत घेतले. तोवर स्टेशनच्या प्रवेशद्वारावर थांबलेला दुसरा रिक्षाचालक धावून आला. ए भाऊ आमी कशाला इथे थांबलोत. लाईनमध्ये ये ना. डायरेक्ट कसे प्रवासी भरतोस असे म्हणत त्याने रिक्षाचा हॅन्डल पकडला. त्यावर त्या चालकाने जाऊ दे भाऊ लांबून आलो, एकालाच तर नेतोय असे म्हणत त्याने रिक्षा दामटली. आतील प्रवासी कुजबुजला. आज कोईमत्तूर गाडी लेट, त्यामुळे झाली गडबड. या लाईनच्या रिक्षाचे भाडे जास्त असते का, अशी त्यांची शंका ऐकू आली. 

नाही तर मयत गळ्यात पडत हुतं 
स्टेशन चौकीत एक पोलीस नाईक  मोठ्या एकाग्रतेने डायरी तपासत होते. तितक्यात एक हवालदार आत आले... ते थोडे कंटाळलेले दिसले, अन् म्हणाले, आज लई जाम अडकलो बुवा. ही घ्या एमएलसी. तिकडं महापालिकेच्या सभागृहात एक वाघ घुसला होता, त्याला ठाण्यात पोहोचवले तवर ही मुळे हॉस्पिटलची एमएलसी आली. रिक्षा उलटून ५५ वर्षीय महिला मरण पावलेली. हे मयत गळ्यात पडतेय का वाटत हुतं. नाही तर आज ड्युटीची वाटच लागत होती. एमआयडीसीला दिला तपास ढकलूऩ़़ म्हणत ते निघून गेले.

रिक्षाची लाईन तोडून बसलात तर...

स्टेशन चौकाच्या आऊटगेटला थांबणाºया रिक्षांचे क्रमांक फलकावर नोंद केले जातात. त्याप्रमाणे त्यांची पाळी ठरते. रात्रीला येथे ३५ रिक्षा थांबतात. या लाईनमधील रिक्षा भाड्याने नेल्यास प्रवाशांचे सामान विसरले तर त्यांना आपोआप परत मिळते. दररोज एकतरी असा प्रकार  घडतो अशी माहिती तालीक शेख यांनी दिली. इंटरसिटीनंतर पहाटे          २ व ३ वा. दक्षिणेकडे जाणाºया गाड्या येतात. यातून आलेल्या प्रवाशांजवळ तिकीट असेल तर रिक्षा घरापर्यंत येतात. या लाईनवरील रिक्षांना रात्रगस्तचे पोलीस अडवत नाहीत.  प्रवाशांचे साहित्य विसरले तर ते पोलीस चौकीत जमा केले   जाते अशी माहिती युवराज गायकवाड यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी एका प्रवाशाने लग्नाचा ४0 हजारांचा शालू व दागिन्यांची बॅग विसरली होती. हरिदास जाधव यांनी बॅग परत केल्यावर संबंधिताने ५00 रुपयांचे बक्षीस दिले. लाईनीतील रिक्षांची ही सुरक्षा आहे, जर तुम्ही लाईन तोडून रस्त्यावर जाणाºया रिक्षात बसलात तर मात्र सुरक्षेची हमी नाही असे येथील रिक्षा चालकांनी सांगितले.


चला विडी घरकुल, विडी घरकुल...
जसा घडाळ्याचा काटा पुढे सरकला तसा ध्वनिक्षेपकावर आणखी एक आवाज वारंवार येऊ लागला चला विडी घरकुल, विडी घरकुल. हे काय म्हणून उत्सुकतेपोटी तेथे जाऊन पाहिल्यावर रात्रीचे दहा वाजले तरी एसएमटीची (महापालिका परिवहन) सेवा सुरू होती. कंट्रोलसमोर रांगेत तीन बस थांबलेल्या, कंट्रोलर शिवानंद अजनाळकर माईकवर गाड्यांची अनाउन्स करीत होते. वाहतूक निरीक्षक सत्यनारायण गांगजी त्यांना सहकार्य करीत होते. रात्री इंटरसिटी आल्यावर विनायकनगर, मल्लिकार्जुननगर आणि मार्केट यार्डकडे जाणाºया प्रवाशांसाठी ही खास सेवा सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दररोज जुन्या व नवीन विडी घरकुलकडे जाणाºया तीन बस भरून जातात. इंटरसिटी येईपर्यंत या तीन बस प्रवाशांच्या प्रतीक्षेत असतात. या सेवेमुळे जुन्या व नवीन विडी घरकुलकडे जाणाºया प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.

इंटरसिटी, सिद्धेश्वरच आमचा धंदा...
स्टेशन चौक म्हणजे शहरातील प्रमुख दळणवळणाचा मार्ग. रेल्वेने सोलापुरात येणाºया प्रवाशांच्या पुढील मार्गावर येथील अनेक रिक्षा चालकांचे पोट भरते. बाह्यमार्ग, दादºयाचा मार्ग, स्टेशनचे दोन बसस्टॉप, प्रवेश मार्ग अशा ठिकाणी रिक्षा थांबे आहेत. दादºयाच्या थांब्यावरील रिक्षांचा जादा व्यवसाय इंटरसिटी व सकाळी येणाºया सिद्धेश्वरच्या प्रवाशांवरच असतो अशी माहिती युन्नूस शेख, हणमंतू गायकवाड यांनी दिली. इंटरसिटी गेल्यावर पहाटे दोनपर्यंत काहीच व्यवसाय नसतो.

मी इथं हाय, असं चौकीकडं ये 
हा वाजत आले तशी स्टेशन चौकीसमोर दुचाकीस्वारांची गर्दी वाढली. इंटरसिटी येण्याची वेळ झाल्याने या गाडीने येणाºयांना नेण्यासाठी आलेल अनेक नातेवाईक मोटरसायकलवर बसून फोनाफोनी करू लागले. गाडी कुठं आली, पाकणी का, मग ये, मी इथं हाय, चौकीच्या बाजूला थांबलोय, असे  संवाद सुरू झाले. बघता बघता गर्दी वाढू लागली. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होतोय असे दिसल्यावर पोलिसांची गाडी सायरन वाजवत तेथे येऊन थांबली. त्यामुळे वेडेवाकडे गाड्या घेऊन थांबलेले सरळ झाले.

Web Title: Solapur of the night; Anna, that is why I fall in love with ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.