रात्रीचं सोलापूर ; चला पुणेऽऽपुणेऽऽ गोड बोलून प्रवासी कोंबण्याची धांदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 03:36 PM2018-12-20T15:36:48+5:302018-12-20T15:40:30+5:30
रात्री 11:00 ते 11:30 एस.टी. स्टॅन्ड परिसरात २४ तास चालणारे दोन्ही हॉटेल सध्या बंद आहेत. रात्री ११ नंतर परगावावरून ...
रात्री 11:00 ते 11:30
एस.टी. स्टॅन्ड परिसरात २४ तास चालणारे दोन्ही हॉटेल सध्या बंद आहेत. रात्री ११ नंतर परगावावरून येणाºया आणि जाणाºया प्रवाशांची गर्दी असते. प्रवास करून थकल्यामुळे थोडा विसावा घेऊन चहा किंवा नाष्टा करण्यासाठी ग्राहक परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये जातात. दुसरीकडे पोलीस येतील आणि ओरड करतील म्हणून हॉटेल मालकांची गडबड सुरू असते. प्रवासी विचारतो जेवण आहे का?, मालक म्हणतो.. चला राईस प्लेट मिळेल बसा लवकर.., लवकर उरका हॉटेल बंद होत आहे. दुसरे ग्राहक हॉटेलमध्ये आले त्याने चहा सांगितला. त्यावर दोन चहा भर रे..., पाणी घे इथं..., मालकाचा चढता आवाज आणि हॉटेल कामगाराची धावपळ पाहून हॉटेल आता बंद होणार याची खात्री प्रवाशाला पटते. कसा-बसा ग्राहक चहा, नाष्टा किंवा जेवण करून हॉटेलमधून बाहेर पडतो. रात्री ११ नंतरच्या एस.टी.स्टँडमध्ये येणाºया बसकडे तर प्रवास करून आलेले प्रवासी आपल्या पुढच्या नियोजित ठिकाणी जातात. ही लगबग होती एस.टी. स्टॅन्डमधल्या प्रवाशांची.
ओ साहेब हात घालून घेऊ नका पैसे द्या आणि घ्या...
- एस.टी. स्टॅन्ड समोरील रस्त्यावर टाईमपास करण्यासाठी व जिभेला चव देणारे शेंगा, वाटाणे, फुटाणे, दाळ आदी पदार्थाची विक्री करणाºया महिला चारचाकी हातगाडी घेऊन परतीच्या मार्गावर होत्या. काही अंतर गेले की ग्राहक तिला अडवून शेंगा विकत घेत होते. मावशी शेंगा गरम द्या, फुटाणे थोडे टाका. मिक्स अॅटम द्या अशी मागणी करून एक शेंगदाणा तोंडात टाकत होते. महिला म्हणाली...ओ साहेब हात घालू नका, पैसे द्या आणि घ्या. जाणारे येणारे मोटरसायकलस्वार परिसरातील प्रवासी आवडीने शेंगा विकत घेऊन खात होते.
चला मामा कुठं जायचंय...बसा रिक्षात...
- रात्री ११.२0 वाजता बाहेरून येणाºया एस.टी. बसमधील प्रवाशांना त्यांच्या घरी किंवा नियोजित ठिकाणी सोडण्यासाठी प्रवेशद्वारावर रिक्षा चालक सज्ज होते. चला मामा कुठे जायचंय... प्रवासी म्हणतो कर्णिक नगर... रिक्षा चालक लगेच म्हणाला चला बसा पटकन..., प्रवासी म्हणाला किती घेणार..., रिक्षा चालक म्हणाला १५0 रुपये. भाडे ऐकून प्रवासी निघून जात असताना... मामा किती देणार बसा रिक्षात सोडतो. अशा पद्धतीने एस.टी. स्टॅन्डमधून बाहेर पडणाºया प्रत्येक प्रवाशाचे सोलापुरात स्वागत केले जात होते.
चला पुणे...चला पुणे...ओ काका पुणे आहे का?
- रात्री ११.१0 वाजता एस.टी. स्टँडच्या दिशेने प्रवासी बसून येणाºया रिक्षाच्या मागे चला पुणे... चला पुणे... ओ काका पुणे आहे का?. बस लागली आहे. असे ओरडत खासगी आरामदायी बसचे कामगार प्रवाशांना आपल्याकडे बोलवत असतात. निघाली... गाडी निघाली... चला १0 मिनिटात गाडी निघणार आहे असे ओरडत आरामदायी बसचे कामगार प्रवाशांना बोलवत होते. काही प्रवासी खासगी आरामदायी बसची वाट पाहत बसलेले होते. प्रवासी बसची वाट पहात होते; मात्र बहुतांशजण मोबाईलवर बोलत होते, मोबाईल बघत होते. बसल्या ठिकाणी वेळ घालवण्यासाठी मोबाईलवर गेम खेळत होते. महिला, मुली, पुरुष मंडळी आपल्या एका हातात बॅग तर दुसºया हातात मोबाईल घेऊन प्रवासासाठी सज्ज होते.
मुख्यमंत्र्यांची सभा मात्र जोरात झाली...भजीच्या गाडीवरची चर्चा....
- रात्र होत आहे, पोटाला भूक लागली असून ती भागवण्यासाठी नागरिक एस.टी.स्टॅन्ड परिसरातील भजीच्या गाडीवर व शेजारी असलेल्या अंडा आॅम्लेटच्या गाडीवर जात होते. एका हातात भजीचा प्लेट दुसºया हाताने खात खात एक प्रवासी मित्राला म्हणाला... सोमवारी वडार समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी मात्र भरपूर आश्वासने दिली. सभा मोठी झाली, लोकांची गर्दीपण मोठी होती. दुसरा प्रवासी म्हणत होता... निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजपला एक एक समाज जोडायचा आहे. आॅम्लेटच्या गाडीवरही तशीच गर्दी होती. पाणी, कोल्ड्रिंक्सबरोबर वेफर्स, कुरकुरे आदी विविध खाद्य पदार्थ विक्री करणारी दुकाने चालू होती.
क्या करना साहब सौ.. दो सौ रुपये मिलते...
- एस.टी. स्टॅन्ड परिसर व अन्य ठिकाणी फिरून मेहबूब अब्दुल रहमान शेख हा रिकाम्या पडलेल्या पाण्याच्या बाटल्या गोळा करीत होता. संपूर्ण एस.टी.स्टॅन्ड परिसराबाहेरील रस्त्यावर फिरून तो बाटल्या गोळा करीत होता. हॉटेलसमोर कुठे बाटली मिळते का त्याचा शोध घेत होता. या बाटल्या काय करतो असे विचारले असता तो म्हणाला क्या करना साहब इसे बेच के सौ...दो सौ रुपये मिलते उसपर घर चलता है.. असे बोलून भले मोठे पोते पाठीवर टाकून मेहबूब निघून गेला.