रात्रीचं सोलापूर ; रात्री वाढदिवस साजरा करून सकाळी बिगारी कामावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 01:22 PM2018-12-26T13:22:26+5:302018-12-26T13:22:49+5:30
सोलापूर : मध्यरात्रीचे दोन वाजलेले. आम्ही शिवाजी चौकातून बाळीवेसकडे निघालो. पुढे वाडियाराज चौक फलकाजवळ सागर धोत्रे, रोनक निंबाळे, नयन ...
सोलापूर : मध्यरात्रीचे दोन वाजलेले. आम्ही शिवाजी चौकातून बाळीवेसकडे निघालो. पुढे वाडियाराज चौक फलकाजवळ सागर धोत्रे, रोनक निंबाळे, नयन कुलकर्णी, आकाश इरकल, अनिल देवकर हे तरुण गप्पा मारत बसले होते. सागर धोत्रे याचा नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला होता. सागर आणि रोनक म्हणाले, आमी रात्री याच कट्ट्यावर असतो. गप्पांचा मूड जमला की पहाट झाल्याचं कळत नाही. मूड नसला की लवकर जातो. सकाळी सगळ्यांना बिगारी कामावर जावं लागतं. रस्त्यावर पोलिसांची गस्त असते. ते हटकतात. पण आमचा काय त्रास नसल्यानं कुणाला काय अडचण नसते. तरटी नाक्यावरचे लोक रात्री ११ नंतर घरी जातात. काही जणी इथंच राहतात. पोलीस गस्तीमुळे या भागात तसं काही घडत नाही. जिंदगी अशीच सुरू आहे, असे सांगायला ते विसरले नाहीत.
आम्ही सोलापूरच्या तिजोरीचे रखवालदार
- सराफ कट्ट्याच्या कोपºयावर प्रकाश चिनवार, प्रभुलिंग आळगुंडी शेकोटी पेटवून बसले होते. चिनवार आमची चौकशी करीत म्हणाले, सराफ कट्टा म्हणजे सोलापूरची तिजोरी. या तिजोरीचे आम्ही वॉचमन... रखवालदार. आमच्यासोबत पृथ्वीराज बायस हे सुद्धा असतात. ते इथंच कुठंतरी असतील. रात्री ११ नंतर अनोळखी माणसाला आम्ही कोणत्याच दुकानाच्या कट्ट्यावर बसू देत नाही. अनोळखी माणसं फिरताना दिसली की पोलीस चौकीत जाऊन सांगतो. आता सीसीटीव्ही कॅमेरे आहेत म्हणा. पण माणसांचा भरोसा नाय. लक्ष ठेवावे लागते. पावसाळा आणि थंडीत आमचे हाल होतात. ट्रॅफिक हवालदारांना जसा निवारा असतो तसे शेड करून आमची आणि पोलिसांची सोय व्हायला हवी. पाऊस कोसळत असला तरी आम्हाला एका कट्ट्यावर थांबून दुकानांकडे लक्ष ठेवावे लागते. शेवटी आमची जिम्मेदारी आहे.
अभी बस नाश्ता मिलता...
- कोंतम चौकातून पुढे कन्ना चौकाकडे जाताना उर्दू शाळेच्या मागे एक टपरी सुरू असल्याची दिसले. रस्त्यावर एक चाचा उभे होते. त्यांनी नाव सांगण्यास नकार दिला. मागे काय सुरू आहे, असे विचारल्यावर त्यांनी, ये आॅम्लेट की गाडी है. अभी बस यहाँनाश्ता मिलता है. आपको क्या काम है, असे विचारून निरोप घेतला.
सेल्फी विथ जिजस...
- शिवाजी चौक ते कन्ना चौकाचा फेरफटका झाल्यानंतर आम्ही सात रस्त्याला पोहोचलो. ख्रिसमसच्या निमित्ताने सोल्जर आॅफ जिजस यूथ फाउंडेशन या सामाजिक संघटनेने साकारलेल्या देखाव्याजवळ रवी, रोमा रोहरा हे लव्या रोहरा या कन्येला सोबत घेऊन सेल्फी घेत होते. सेंट जोसेफ शाळेतील ख्र्रिसमसचा उत्सव संपवून आम्ही घरी निघालोय, असे रवी रोहरा यांनी सांगितले. यानंतर मंडळाचे कार्यकर्ते सनी रणदिवे, आशिष रानडे, शैलश झोंबाडे, अल्फात शेख, याकूब आडसुळे यांनी देखाव्याची माहिती दिली. सर्वांना मेरी ख्रिसमस करून आम्ही निरोप घेतला.
दुकानांसमोर कचराच कचरा
- स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच... अशी गर्जना देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्याजवळ आम्ही पोहोचलो. पुतळ्यावर लख्ख प्रकाश होता. टिळक चौकातील एका दुकानाच्या कट्ट्यावर एक माणूस झोपला होता. परिसरात शांतता होती. तिथून पुढे मधला मारुतीपर्यंत फेरफटका मारला. दुकान बंद करण्यापूर्वी रस्त्यावर कचरा टाकू नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. पण अनेक दुकानांपुढे कचºयाचे ढीग दिसले. मधला मारुती चौकातील दुकानदारांनी तर कहर केल्याचे पाहायला मिळाले. वारंवार दंड करूनही ‘स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर’ या अभियानाबाबत व्यापारी जागरुक नसल्याचे पाहायला मिळाले.
हा भाग अतिसंवेदनशील म्हणा ना...
- मंगळवार पेठ पोलीस चौकीत पोहोचल्यानंतर ड्यूटीवर असलेले फिरोज शेख, नीलप्पा राठोड यांच्यासोबत गप्पा रंगल्या. हा भाग म्हणजे सोलापूरचे नाक आहे. इतर ठिकाणच्या बंदोबस्तापेक्षा इथं जरा जास्त काळजी घ्यावी लागते. हा भाग अतिसंवेदनशील आहे म्हणा ना! चाटी गल्ली भागात जवळपास सर्वच बँकांच्या शाखा आहेत. एटीएम आहेत. मुख्य रस्त्याबरोबरच गल्लीबोळात जाऊन पाहणी करावी लागते. एमएलसी आली की दोघांपैकी एक जण चौकीत थांबतो. दुसरा सिव्हिलला जातो. सराफ कट्टा भागातील काही दुकाने तुम्हाला छोटी दिसतील. पण मालक-भाडेकरू यांच्यातील वाद खूपच मोठे आहेत. सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि मध्यरात्रीसुद्धा मालमत्तेच्या भांडणातून काही लोक चौकीपर्यंत येतात. मारामारीचे प्रकरण परवडले. पण यांचे मालमत्तेचे वाद ऐकून वैताग येतो. पावसाळा आणि थंडीत ड्यूटीवर असलेल्यांचे हाल होतात, असेही दोघांनी आवर्जून सांगितले.