रात्रीचं सोलापूर ; रात्रीच्या अंधारात तयार होतात झगमगणारे ‘साईन बोर्ड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 07:12 PM2018-12-27T19:12:21+5:302018-12-27T19:12:53+5:30
सोलापूर : रात्रीचे अडीच वाजलेले... सामाजिक, सांस्कृतिक, कला अनेक गुणसंपन्न गोष्टींचा वारसा लाभलेल्या सिव्हिल चौक, किडवाई चौक, बारा इमाम ...
सोलापूर : रात्रीचे अडीच वाजलेले... सामाजिक, सांस्कृतिक, कला अनेक गुणसंपन्न गोष्टींचा वारसा लाभलेल्या सिव्हिल चौक, किडवाई चौक, बारा इमाम चौक, समाचार चौक, कोंतम चौक, पद्मा टॉकीज परिसरात फेरफटका मारला़ उराशी मोठी स्वप्नं बाळगत मजुरी करून गुजराण करणारी सर्वाधिक माणसं या वैभवसंपन्न चौकात दिसून आली. अशाच पद्धतीने जबर इच्छाशक्तीच्या बळावर रात्री साईन बोर्ड बनवणारी मुले पद्मा टॉकीजमागील हिंगुलांबिका देवी मंदिराच्या बाजूला दिसून आली़ त्यांच्या संवादातून रात्रीत ‘आयुष्याचा’ साईन बोर्ड फुलवणारे हात दिवसाही किरकोळ कामांवर राबताना जाणवले़ इम्तियाज अहमद यांच्या दुकानात रात्रीला जागून साईन बोर्डाचे काम करणारी १० ते १२ मुले राबताना दिसली. माता-पिता नसणाºया मुलांनाही रोजी-रोटी देऊन त्यांना पुढे जाण्यासाठी मदत करणारे इम्तियाज अहमद हे त्यांना आपल्या भावांप्रमाणे वागणूक देऊन त्यांचे उद्याचे भवितव्य भक्कम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगतात़ काळ बदलेल ना बदलेल, मात्र वेळ मात्र नक्की बदलेल... असा आशेचा किरण ते या मुलांना दाखवितात़
भाई चाय पिनी है...जल्दी करो
- शहरातील मध्यवर्ती चौकात नागरिकांच्या सोयीसाठी काही बोटांवर मोजण्याइतकी चहा कम पान टपरी पाहायला मिळते़ काही दुकानदार ‘भाई चाय पिनी है... चलो जल्दी, ठहरो मत... पुलीस आयेगी’ रात्रीच्या वाटसरूंना अशा पद्धतीने खुणावताना पाहायला मिळाले़ चहाचा कडक घोट आणि सिगारेट फुंकत पुढचा मार्ग गाठणारी तरुणाई येथे दिसून आली़
जावे त्या चौकात कुत्रीच कुत्री़..
- सामसूम रस्त्यावर कोणीच दिसत नव्हते. मात्र जावे त्या चौकात मोठ्या संख्येने कुत्री दिसायची़ सहज कोणी चालत निघाला तरी कुत्र्यांची टोळी भुंकत मागे लागलेली आणि भयभीत झालेला वाटसरू हाड... हाड... म्हणत दगड घेऊन, इशारा देत अंतर कापताना दिसतो़ अनेक चौकांमध्ये हेच चित्र होते़ अनेकांनी या शहरात माणसांपेक्षा कुत्र्यांची संख्या वाढायला लागल्याचा टोमणा मारताना पाहून काही वेळ हसूही आले़
३२ वर्षांपासून रिक्षाची सेवा देतो
- बारा इमाम चौकात रात्रीला संकटात असलेल्या किंवा पर्यायी वाहन नसलेल्यांना सेवा देणाºया रिक्षा थांबलेल्या दिसल्या़ गरोदर महिला ते अनेक प्रकारच्या रुग्णांना वेळेत दवाखान्यात पोहोचविण्याची जबाबदारी कशी पार पाडतो हे सांगणारे ३२ वर्षांपासून सेवा देणारे अकील अलीम भेटले़ त्यांच्या मदतीला महंमदरफी मोहोळकर, अहमदअली मोहोळकर होते़
‘अधिकाºयांच्या सात गाड्या येतात... चेकिंग होते’
- संवेदनशील चौक म्हणून ओळखल्या जाणाºया विजापूर वेस चौकात पोलिसांचा नेहमी बंदोबस्त असतो़ अनेक चांगल्या-वाईट घटनांचा साक्षीदार म्हणून पाहिल्या जाणाºया चौकात पोलिसांचे फिक्स पॉइंट दिसून आले़ संवाद साधताच ‘रात्रीत सात अधिकाºयांच्या गाड्या काही वेळांच्या अंतराने येतात... झोपून अजिबात चालत नाही... दोन पावलांवर फौजदार चावडी तर इकडे दोन पावलांवर जेलरोडची हद्द...’ असल्याची खंत हवालदार श्रीकांत कुलकर्णी आणि जोडीदार तन्वीर पटेल यांनी मांडत रात्री आठ ते सकाळी आठ पहारेकºयांसारखी पहाट जागून काढावी लागते, असे म्हणाले़
मासळीच्या बाजारात अंडा बुर्जी...
- रात्री २़४० वाजता मंगळवार बाजार म्हणून ओळखल्या जाणाºया सुनसान मासळी बाजारात फेरफटका मारला असता येथे भुंकणारी कुत्री आणि मोकळी बाजारपेठ होती़ काही अंतरावर मात्र गरीब मुले हातगाड्यांवर अंडा बुर्जी विकून गुजराण करताना दिसली़ संपूर्ण मासळी बाजारात अंडा बुर्जीचा धंदा जोरात चाललेला दिसला.
हाड..हाड़..भिरका पत्थर, मार साले को
- बारा इमाम चौकातून विजापूर वेशीत चहासाठी निघालेल्या तरुणाला कुत्र्याच्या घोळक्यांनी घेरले़ एकट्या-दुकट्यापुढे भरपूर कुत्र्यांची संख्या दिसता तो भेदरून जातो़ त्याने हातामध्ये दगड घेतला, त्याच्या दिशेने भिरकावण्याच्या तयारीत असताना पाठीमागून आवाज आला... हाड... हाड... भिरका पत्थर, मार साले को... कुत्र्याच्या गराड्यात अडकलेल्या त्या एकाकी तरुणाला बळ आले़़