रात्रीचे सोलापूर ; घरी कुणीतरी तुमची वाट पाहतंय, सांगणारा ट्रॅफिक पोलीस एकटाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 03:20 PM2018-12-18T15:20:31+5:302018-12-18T15:20:48+5:30
चटपटीत खाण्यासाठी दिसली खाऊगर्दी... - महावीर चौकातील कॉर्नरवर काहीतरी खमंग, गरमागरम व चटपटीत खाण्यासाठी आलेल्या युवकांची गर्दी याठिकाणी दिसली. ...
चटपटीत खाण्यासाठी दिसली खाऊगर्दी...
- महावीर चौकातील कॉर्नरवर काहीतरी खमंग, गरमागरम व चटपटीत खाण्यासाठी आलेल्या युवकांची गर्दी याठिकाणी दिसली. चायनीज, शाकाहारी,मांसाहारी खाद्यपदार्थ खाण्याकरिता या ठिकाणी चांगलीच खाऊगर्दी वाढली होती. ग्राहकांच्या सेवेकरिता रात्रीही सज्ज रहावे लागत असल्याची प्रतिक्रिया यावेळी याकूब सय्यद यांनी दिली. याच चौकात हातगाडीवर आईस्क्रीम विक्री करणारा बिहारी युवक विनोद भुसाळ यांने मात्र थंडीमुळे ग्राहक नसल्याने कागदाच्या पुडीत चणे फुटाने खात वेळ घालवत असल्याचे दिसून आले. ग्राहकांसाठी रात्री साडेअकरापर्यंत आपण थांबतोच असे त्याने सांगितले.
ट्रॅफिक कंट्रोलमध्ये मग्न पोलीस
- रात्री नऊ वाजताच जड वाहतूक सुटली होती. हैदराबाद आणि विजापूरकडून येणाºया ट्रक्स ओळीने महावीर चौकातून मार्गस्थ होत होत्या. याचवेळी होटगी रोड, जुळे सोलापुरातून काही कामासाठी गेलेले सोलापूरकर भरधाव वेगाने चौकातून मार्गस्थ होत होते... या वाहनांचे नियंत्रण करणारा एकटा वाहतूक शाखेचा पोलीस मोठ्या जिद्दीने तो लोकांना सांगत होता..सावकाश जा, घरी तुमची कुणीतरी वाट पाहतंय!
भूक लागली...जाऊ द्या ना घरी...
- महावीर चौकात रात्री जड वाहतूक सुरळीत करण्यासाठी तासन्तास थांबलेल्या वाहतूक पोलिसांनी जड वाहतुकीचा लोड कमी झाल्यानंतर जेवणासाठी घरी जाण्याच्या घाईत असताना दिसून आले. हेवी ट्रक जात असतानाच त्यांच्या समोरूनच जाणाºया दुचाकी चालकांना आवरताना पोलिसांच्या नाकीनऊ येत असल्याचे यावेळी दिसून आले. एका तासात सुमारे सत्तर ते ऐंशी ट्रकला हिरवा कंदील देण्याचे काम करावे लागते असे सांगून येथे नेमणुकीस असलेले वाहतूक पोलीस विष्णू चोपडे व हवालदार भोसले यांनी भूक लागली आहे, जाऊ द्या ना घरी असे म्हणत निरोप घेतला.
बिनधास्त घोरतोय सुरक्षा जवान
- महावीर चौकात असलेल्या एका बड्या व्यक्तीच्या बंगल्यात ट्रक घुसून भिंतीचे मोठे नुकसान झाल्याची घटना गत काही वर्षांपूर्वी घडली होती. असे असतानाही याच ठिकाणी असणाºया एका हॉटेलसमोर बिनधास्त शाल पांघरून घोरत झोपी असलेला कामगार दिसून आला. त्याला कोणतीच भय किंवा चिंता नसल्याचे दिसून आले.
दिव्यांगाच्या मदतीला युवक धावला
- गुरुनानक चौकात जड वाहतूक सुटल्याने ट्रकची वर्दळ वाढली होती. अशातच रात्री सव्वादहाच्या सुमारास या चौकात एक अपंग मध्यभागी अडकला. सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या दिशेने पथमार्गावर जाण्याकरिता धडपडणाºया अपंगाचे चित्र व्याकूळ करणारे होते. अवजड वाहनांच्या सापळ्यातून बाहेर काढून त्याला रस्त्याच्या बाजूला सुरक्षित काढण्यासाठी येथून जाणारा युवक सोएब शेख याने त्याला मदतीचा हात देत विचापूरस केली; मात्र त्या अपंगाने युवकाची मदत नाकारून एका पायानेच घसरत जाऊन चौक पार केला. त्याचे नाव विचाले असता त्याने संजय एंट्री असे सांगितले. औरंगाबाद येथून तो शहरात आल्याचेही त्यांनी सांगितले.
शास्त्रीनगर रात्री १०.२० ड्रेनेजची दुरूस्ती जोमात
- या परिसरामध्ये ड्रेनेजच्या दुरूस्तीचे काम जोमात सुरू होते. ड्रेनेजला मोठी गळती लागल्याने पाणी रस्त्यावर आले होते. महापालिकेचे कर्मचारी ही गळती थांबविण्यासाठी प्रयत्नशील असतानाच एक युवक तिथे आला अन् पुटपुटत म्हणाला, मुख्यमंत्री शहरात येणार म्हटल्यावर काय तरी करावे लागतेच ना!...या युवकाने लगावलेला या शाब्दीक टोल्यामुळे ड्रेनेज दुरूस्ती कर्मचाºयांचे चेहरे पाहण्यालायक झाले होते; पण त्यांचीही मजबुरीच होती...हा युवक मात्र टोला लगावून पसार झाला.
शास्त्रीनगर रात्री १०.१५ वाजता
ये क्या नयी बला है!
- शास्त्रीनगरात असणाºया एस.टी.बस स्थानकासमोर ड्रेनेजलाईन तुंंबल्याने या दुरुस्तीसाठी महापालिकेकडून खड्डा मारण्यात आला होता. त्यामुळे एका बाजूने वाहतूक थांबवून ती एकेरी करण्यात आल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली. रस्ता बंद करून बॅरिकेड लावल्यानंतरही त्यात घुसून काही दुचाकी व कारचालक खड्ड्याच्या बाजूने वाहने घेण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे दिसून आले. घुसणाºया वाहन चालकांना अडविण्याचा प्रयत्न येथील सुरक्षारक्षक लियाकत खान यांनी केला; मात्र त्याचे ऐकणारे ते सोलापूरकर कसले. सुरक्षा सुरक्षाच्या विनंतीवरूनही वाहने खड्ड्याच्या दिशेने घालणाºया चालकांना येथीलच स्थानिक युवक आरिफ शेख हे थांबविण्याची विनंती करत पुढं गटार तुंबलंय, घाण वास येतंय, मारू द्या खड्डा त्यांना असे सांगत वाहतूक एकेरी करण्यासाठी मदत करताना दिसला. दुसºया एका अन्य युवकानेही घुसखोरी करणाºया वाहनचालकांना रोखण्याचा प्रयत्न केला. या युवकला सहजच नाव विचारले. चांगलं काम करत होता तो. त्यामुळे त्याचे कौतुक करण्याची इच्छा होती; पण तो म्हणतो कसा, अब क्या यह, नयी बला असे पुटपुटून त्यांनी येथून काढता पाय घेतला.