Solapur: मुदतीत ऑनलाइन परीक्षा फॉर्म न भरलेल्यांना ऑफलाइनची संधी, सोलापूर विद्यापीठाचा निर्णय
By बाळकृष्ण दोड्डी | Published: June 17, 2023 06:40 PM2023-06-17T18:40:21+5:302023-06-17T18:40:36+5:30
Solapur: ऑनलाइन परीक्षा फॉर्म न भरल्यास त्यांचे ऑफलाइन परीक्षा अर्ज भरून घेऊन त्यांच्या पीएनआर क्रमांकावरून त्यांना परीक्षेला बसण्याची सोय करण्यात येणार असल्याने एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, अशी माहिती प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी दिली.
- बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा सोमवार, १९ जून पासून सुरू होत असून काही विद्यार्थ्यांचे आरआर (डबल आर), गैरहजर व अन्य तांत्रिक कारणांमुळे ऑनलाइन परीक्षा फॉर्म न भरल्यास त्यांचे ऑफलाइन परीक्षा अर्ज भरून घेऊन त्यांच्या पीएनआर क्रमांकावरून त्यांना परीक्षेला बसण्याची सोय करण्यात येणार असल्याने एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, अशी माहिती प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी दिली.
मार्च-एप्रिल २०२३ च्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा १९ जूनपासून सुरुवात आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून परीक्षेची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२२ च्या परीक्षेतील निकाल ज्या विद्यार्थ्यांचे डबल आर, गैरहजर, शून्य गुण होते, अशा विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण करून ऑनलाईन परीक्षा फॉर्म महाविद्यालयाच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिले आहे.
ज्या विद्यार्थ्यांचे ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२२ च्या परीक्षेतील निकाल तांत्रिक कारणास्तव प्रलंबित असल्यास त्यांचे परीक्षा फॉर्म ऑनलाईन उपलब्ध होऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म संबंधित महाविद्यालयीन पातळीवर ऑफलाईन भरून घेऊन त्यांना पीएनआर क्रमांकावरून परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी. या विद्यार्थ्यांच्या सर्व उत्तरपत्रिका, उपस्थिती अहवाल, महाविद्यालयाच्या पत्रासह स्वतंत्रपणे मध्यवर्ती मूल्यमापन केंद्रावर जमा करण्यात यावी, अशी सूचना देखील विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने काढलेल्या परिपत्रकात केली आहे.