Solapur: अरे देवा, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याची खुर्ची घाण पाण्यात ठेवली ? जाणून घ्या नेमकं कारण
By Appasaheb.patil | Published: July 21, 2023 04:03 PM2023-07-21T16:03:39+5:302023-07-21T16:30:43+5:30
Solapur News: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस रमेश बारसकर व विधानसभा अध्यक्ष मंगेश पांढरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याची कार्यालयातून खुर्चीच उचलून आणून मोहोळ तहसील कार्यालयाबाहेरील पाण्याच्या खड्ड्यात ठेवून आंदोलन चालू केले आहे.
सोलापूर - मोहोळ तहसील कार्यालयाच्या एका गेटला वैतागलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नागेश बिराजदार या युवकाने चक्क पाण्यात बसून वृक्षारोपण करून घाण पाण्याने आंघोळ करीत आंदोलन सुरू केले असतानाच , दुसऱ्या बाजूच्या रस्त्याला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस रमेश बारसकर व विधानसभा अध्यक्ष मंगेश पांढरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याची कार्यालयातून खुर्चीच उचलून आणून मोहोळ तहसील कार्यालयाबाहेरील पाण्याच्या खड्ड्यात ठेवून आंदोलन चालू केले आहे.
मोहोळ तहसील कार्यालयाच्या आवारातील आजचा दिवस हा जणू आंदोलनानेच गाजला. तहसीलकार्यालयाच्या परिसरामध्ये तालुक्यातील शेकडो गावचे लोक ये-जा करतात. या आवारामध्ये अनेक महत्त्वाची कार्यालय आहेत, परंतु मागील दोन-तीन दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे तहसील कचेरीच्या आवारामध्ये अक्षरशः पाण्याचे तळे साचले आहे. तहसीलदार कार्यालय, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, भूमी अभिलेख अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, सेतु कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय आदी कार्यालय याच परिसरात आहेत. मात्र या कार्यालयास येण्यासाठी नागरिकांना गुडघाभर पाण्यातून यावे लागते. एवढेच नव्हे तर अधिकारी, कर्मचारीही रोज या पाण्यातून येतात, परंतु एकाही अधिकाऱ्याला या आवारामध्ये मुरूम टाकण्याची मानसिकता दिसून आली नाही. अखेर वैतागलेल्या ग्रामस्थांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला असे सांगण्यात आले.