Solapur: कांद्याला दर मिळेना, तरीही सोलापुरात ८०० ट्रक आवक
By दिपक दुपारगुडे | Published: March 15, 2023 12:31 PM2023-03-15T12:31:19+5:302023-03-15T12:31:37+5:30
Onion Price: गेल्या महिनाभरापासून कांद्याचा दर कोसळला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या रानात मोठ्या प्रमाणात कांदा पडून आहे. त्यामुळे दर कमी असतानाही सोलापूर कृषी बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
- दीपक दुपारगुडे
सोलापूर - गेल्या महिनाभरापासून कांद्याचा दर कोसळला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या रानात मोठ्या प्रमाणात कांदा पडून आहे. त्यामुळे दर कमी असतानाही सोलापूर कृषी बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सुमारे ७०० ते ८०० ट्रक कांद्याची आवक आहे.
सोलापूर कृषी उत्पन बाजार समितीत कांद्याची आवक मोठी असते. लासलगावच्या कांदा मार्केटला मागे टाकत सोलापूरने देशात नाव केले आहे. त्यामुळे सोलापूर बाजार समितीत वर्षभर कांद्याची आवक असते. जानेवारी महिन्यापासून सरासरी ५०० ट्रक कांद्याची आवक सुरू आहे. जानेवारी महिन्यात सरासरी १५०० रुपयांपर्यंत दर मिळत होता. मागील एक महिन्यात दर कोळसला आहे. चांगला कांदाही हजार रुपयांच्या आतच विकला जात आहे.
सरासरी ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. यंदा परतीच्या पावसानंतर शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली आहे. त्यामुळे आता मार्च महिन्यात कांद्याची काढली सुरू आहे. मिळेल त्या दरात विकून टाकण्यासाठी शेतकरी आजही मोठ्या प्रमाणात कांदा मार्केटमध्ये घेऊन येत आहेत. त्यामुळे सोलापूर बाजार समितीत सर्वत्र कांदाच कांदा पाहायला मिळत आहे.
अनुदान मिळविण्याची आशा
राज्य शासनाने कांद्याला ३०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे कांद्याची आवक वाढली आहे. साधारण एक हजार रुपयांचा दर मिळाला, तरीही अनुदानाची रक्कमही मिळणार आहे. त्यामुळे दर १३०० रुपये पडेल, अशी आशा आहे. त्यामुळे शेतकरी कांदा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आणत आहेत, अशी माहिती संचालक केदार उंबरजे यांनी दिली.