सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाला मिळतेय गती; उत्तर तालुक्यातील गावांची मोजणी सुरू
By Appasaheb.patil | Published: August 24, 2022 03:26 PM2022-08-24T15:26:14+5:302022-08-24T15:27:20+5:30
सेवालालनगर, भोगाव, देगाव, बाळे, मार्डीतील शेतकऱ्यांना लवकरच पैसे मिळणार
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : बहुचर्चित सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या ८४ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाच्या कामास आता हळूहळू मोठी गती मिळत आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील पाच गावांमधील जमिनीची अंतिम मोजणी भूसंपादन विभाग व रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. मोजणीनंतर शेतकऱ्यांना बाधित जागेचे पैसे लवकरच देणार असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या वतीने कळविण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण भारत अशा तीन शहरांना जोडला जाणारा महत्त्वपूर्ण मार्ग म्हणून सोलापूर -उस्मानाबाद मार्ग ओळखला जाणार आहे. मार्गातील लाईन मार्कींगचे काम काही महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आले. रेल्वे विभागातील अधिकारी आणि भूमी अभिलेख कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोजणीचे काम सुरू असून त्यासाठी बाधित जमिनीच्या शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष मोजणीच्या वेळी उपस्थित राहण्याचे आवाहन रेल्वेचे आणि भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी केले आहे.
---------
या गावात होतेय मोजणी
- - सेवालालनगर
- - भोगाव
- - देगाव
- - मार्डी
- - बाळे
---------
वर्षभरात होईल प्रत्यक्ष कामाला सुरुवात
भूसंपादनासाठीची मुख्य प्रक्रिया सुरू झाली आहे. संबंधितांना नोटिसा पाठविल्या आहेत. कोणाचीही हरकत नसेल तर भूसंपादन लवकर होईल, त्यानंतर मुख्य कामासाठी पुन्हा रेल्वे मंत्रालयाकडे आराखडा तयार करून निधीची मागणी होईल, निधी मंजूर झाल्यानंतर रेल्वे मार्गाचे काम सुरू हाेईल, काम सुरू झाल्यानंतर साधारण- एक ते दीड वर्षाच्या आत हा मार्ग तयार होईल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
--------
रेल्वे अन् भूसंपादन अधिकाऱ्यांची टीम
उत्तर सोलापूर तालुक्यातील पाच गावातील रेल्वे मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीचे मोजणीचे काम सुरू आहे. हे काम भूसंपादन कार्यालय व रेल्वे विभागाच्या उपस्थितीत होत आहे. मोजणीसाठी शेतकऱ्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. यासाठी रेल्वेचे पाच ते सात अधिकारी व भूसंपादन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित आहेत.
--------
शेतकरी आनंदी अन् प्रतीक्षेतही
सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद हा रेल्वे मार्ग आपल्या शेतातून जाणार व आपल्याला योग्य तो मोबदला मिळणार या आशेने उत्तर सोलापूर तालुक्यातील पाचही गावातील शेतकरी आनंदी आहेत. शिवाय भूसंपादनाचे पैसे कधी मिळणार व रेल्वे कधी धावणार याबाबतचीही उत्सुकता शेतकऱ्यांना लागून राहिली असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.