सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासाठी लागणार तीन हजार कोटी रुपये
By बाळकृष्ण दोड्डी | Published: January 12, 2023 09:16 PM2023-01-12T21:16:41+5:302023-01-12T21:16:50+5:30
पाच वर्षात सोलापूर ते उस्मानाबाद हा ८४ किलोमीटरचा मार्ग पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्नशील राहणार आहे.
सोलापूर :सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गाची भूसंपादन प्रक्रिया सुरू असून, साेलापूर हद्दीतील सत्तावीस किलोमीटर रेल्वेमार्गाची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. हा प्रकल्प साधारण तीन हजार कोटी रुपयांचा असून, या प्रकल्पाकडे केंद्र सरकारचे विशेष लक्ष आहे. राज्य शासनाने ४५२ कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे पाच वर्षात सोलापूर ते उस्मानाबाद हा ८४ किलोमीटरचा मार्ग पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्नशील राहणार आहे.
रेल्वेमार्गासाठी आवश्यक नऊ गावांतील जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण झाली असून, भूसंपादन प्रक्रियेसाठी रेल्वे प्रशासनाने जिल्हा प्रशासनाच्या भूमी व अभिलेख विभागाकडे मोजणी रक्कम भरली आहे. सर्व्हे परिसरात येणाऱ्या उत्तर सोलापूर तालुक्यातील काही भागाचा आणि खेड गावाचा संयुक्त सर्व्हे होणे बाकी होता. तेही काम आता पूर्ण झाले आहे. फक्त शहर हद्दीत येणाऱ्या बाराशे मीटर रेल्वेमार्गाची मोजणी बाकी आहे. या शिवाय बाळे, भोगाव, बाणेगाव, मार्डी, वनसळ, सेवालालनगर, उत्तर सोलापूर, खेड भागातून जाणाऱ्या रेल्वेमार्गासाठी आवश्यक जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे.